जम्मू-कश्मीर, लडाख आमचेच; शांघाय परिषदेत पाकिस्तानचा दावा


एएमसी मिरर वेब टीम 
ऑनलाइन न्यूज : रशियात भरलेल्या शांघाय को ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीत पाकिस्तानने जम्मू-कश्मीर, लडाखवर कब्जा असल्याचा माथेफिरू दावा केला. पाकिस्तानच्या या कुरापतीमुळे संतप्त झालेले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी बैठकीवरच बहिष्कार घातला. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानने घेतलेली भूमिका शांघाय परिषदेच्या नियमाविरोधात असल्याचे म्हटले आहे.

रशियातील मॉस्को येथे शांघाय को ऑपरेशन ऑर्गनायझेशनची बैठक सुरू आहे. आतापर्यंत या संघटनेच्या वतीने संरक्षण, परराष्ट्र खात्यांच्या मंत्र्यांची बैठक घेण्यात आली. आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसुफ यांनी जम्मू-कश्मीर, लडाख, सर क्रीक, जुनागड हा भूभाग आपल्या ताब्यात असलेला नकाशा सादर केला. ऑगस्टमध्ये मंजुरी देण्यात आलेला हा नवा नकाशा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येणार असल्याचे युसुफ यांनी सांगितले.

पाकिस्तानच्या या कुरापतीमुळे हिंदुस्थानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे भयंकर संतापले. बैठकीचे यजमान असलेल्या रशियाला डोभाल यांनी खडे बोल सुनावत हा शांघाय परिषदेच्या नियमांचा थेट भंग असल्याचे सांगून त्यांनी बैठक सोडून जाण्याचा निर्णय घेतला. हिंदुस्थानने बहिष्कार टाकल्यानंतरही पाकिस्तानी प्रतिनिधींनी आपला हेका सोडला नाही.

इम्रान सरकारची आगळिक
नेपाळ सरकारने लिपूलेखसह इतर भाग आपल्या कब्जात दाखवल्यानंतर पाकिस्तानातील इम्रान सरकारलाही नकाशा बदलण्याची उचकी लागली. ऑगस्टमध्येच पाकिस्तानने आपला नवा नकाशा जारी केला. यात जम्मू-कश्मीर, जुनागड, लडाख, सरक्रीक या भागावर कब्जा दाखवण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post