एएमसी मिरर वेब टीम
पुणे : शहरातील विविध भागात पिस्तूलाच्या विक्रीसह गुन्हे करण्यासाठी पिस्तूलांचा साठा करणाऱ्या सराईत टोळीला हडपसर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तब्बल 18 गावठी बनावटीचे पिस्तुल, 28 जिवंत काडतुसांसह 5 लाख 70 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पुण्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडण्याची पहिलीच वेळ असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
अरबाज रशिद खान (वय 21, रा. गंगा फेज बिल्डिंग, शिरुर), सूरज रमेश चिंचणे (वय 22, रा.गंगानगर, फुरसुंगी, हडपसर), कुणाल नामदेव शेजवळ उर्फ यश ( वय 19, रा. बुरुड आळी, शिरुर) , जयेश राजू गायकवाड उर्फ जय (वय 23, रा. लाटे आळी, शिरुर), विकास भगत तौर उर्फ महाराज (वय 28, लक्ष्मी नगर, येरवडा), शरद बन्सी मल्लाव (वय 21, रा. काचे आळी, शिरुर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अशी माहिती पोलिस उपायुक्त सुहास बावचे यांनी याबाबत पत्रकार परिषदेत दिली. यावेळी हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश साठे, पोलिस निरीक्षक हमराज कुंभार उपस्थित होते.
घरफोडीसह अन्य चोरीच्या गुन्ह्याबाबत तपास करताना फुरसुंगी परिसरात काही तरुण बेकायदा पिस्तुल बाळगून उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचुन अरबाज, सुरेश, कुणालला ताब्यात घेतले. त्यांच्याकडुन 18 पिस्तुल व 28 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. सर्व टोळी सराईत असून त्यांच्याकडून शस्त्राचा वापर विविध प्रकारचे गुन्हे करण्यासाठी होणार असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यांनी अजून काही गुन्हे केले आहेत का यासंदर्भात माहिती घेतली जात आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे, पोलीस निरीक्षक हमराज कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने, युसूफ पठाण, राजेश नवले, प्रताप गायकवाड, सैदोबा भोजराव, विनोद शिवले, नितीन मुंढे, अकबर शेख, शशिकांत नाळे, शाहिद शेख, प्रशांत टोणपे, गोविंद चिवळे, अमित कांबळे, प्रवीण उत्तेकर, नरसाळे यांच्या पथकाने केली.
Post a Comment