गांधींनी दिले लांडगेंना आव्हान; 'नगर अर्बन' पुन्हा चर्चेत


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : नगर अर्बन बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी बॅंकेचे कर्जदार आशुतोष लांडगे यांना समोरासमोर चर्चा करण्याचे आव्हान दिले आहे. गांधी व लांडगे यांनी काही दिवसांपूर्वी पोलिसात एकमेकाविरुद्ध मारहाणीची तक्रार दिली आहे. त्यानंतर लांडगे यांनी पोलिसांना स्वतंत्र अर्ज देऊन गांधी यांनी 50 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे. या आरोपाबाबत समोरासमोर चर्चा करण्यासाठी येण्याचे आव्हान गांधी यांनी लांडगे यांना दिले आहे.

उद्या मंगळवारी दि. 22 सप्टेंबरला '50 लाखाची खंडणी' या विषयावर समोरासमोर चर्चेकरिता आशुतोष लांडगे व मिडीया प्रतिनिधी यांनीच फक्त यावे, आवाहन गांधी यांनी केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतरांनी गर्दी करू नये, असेही त्यांनी आवर्जून सांगितले आहे.

22 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता वाडिया पार्क जवळील महात्मा गांधी पूतळ्याजवळ या चर्चेसाठी बोलावण्यात आले आहे. सर्वांनी मास्क घालून यावे. सोशल डिस्टसिंगचे पालन करावे, असे आवाहन राजेंद्र गांधी यांनी केले आहे.

राजेंद्र गांधी म्हणाले, लांडगे यांनी माझ्याविरुद्ध पोलिसात दाखल केलेल्या गुन्ह्यात कोठेही खंडणी मागितल्याचा उल्लेख नाही. तसेच त्या गुन्ह्यात त्यांनी पूर्तता केली नाही, असा उल्लेख केला आहे. पण ही पूर्तता म्हणजे काय तसेच ही मागणी करताना कोण साक्षीदार तेथे होते, याचाही उल्लेख नाही. त्यानंतर त्यांनी खंडणी मागत असल्याचे पत्र पोलीस अधिकाऱ्यांना दिले असल्याने ही खंडणी मी त्यांना कधी मागितली, त्यावेळी कोण साक्षीदार होते, हे त्यांनी समोरासमोर येऊन जाहीर करावे, असे माझे त्यांना आवाहन आहे. त्यांनी 22 रोजी सकाळी 11.30 वाजता महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर यावे व खुलासा करावा, असे माझे त्यांना आव्हान आहे, असेही गांधी यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, नगर अर्बन बँकेच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी पोलीस कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ बँकेचे काही सभासद बँकेच्या प्रशासकांच्या दालनात आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

Post a Comment

Previous Post Next Post