महाराष्ट्रात ‘भाभीजी पापड’ खाऊन लोक बरे झाले का? संजय राऊत यांचा सवाल

 


एएमसी मिरर वेब टीम
नवी दिल्ली :
राज्यसभेत बोलताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज महाराष्ट्र सरकारने कोविड 19 संदर्भात केलेली कामगिरी सभागृहात मांडली. त्याचवेळी महाराष्ट्र सरकारवर बुधवारी सभागृहात केवळ टीका करणारे भाजप खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला. तसेच केंद्रीय मंत्र्यांच्याच दाव्यावरून फक्त आरोप करणाऱ्या भाजप खासदारांना त्यांनी खास शैलीत उत्तर दिले.

सभागृहात बोलताना संजय राऊत म्हणाले की, बुधवारी या सभागृहात भाजप खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी महाराष्ट्र सरकार काहीच करत नसल्याचे आरोप केले. मात्र असे आरोप करणाऱ्या खासदारांना मी विचारू इच्छितो की महाराष्ट्रात लोक कोविड 19 मधून बरे झाले ते कसे काय? हे लोक काय ‘भाभीजी पापड’ खाऊन बरे झाले का?, असा खरमरीत सवाल राऊत यांनी यावेळी केला.

हे दिवस आरोप करण्याचे नाहीत तर मिळून काम करण्याचे आहेत. ही काही राजकीय लढाई नाही तर आपले आणि लोकांचे जीव वाचवण्याची लढाई असल्याचे ते म्हणाले.

तसेच महाराष्ट्र सरकारने पहिल्या दिवसापासून स्पष्ट केले आहे की हे जागतिक संकट असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातच ही लढाई लढली जाईल. आजही केंद्राने आखलेल्या नियम आणि तत्त्वांनुसारच राज्य सरकार काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मुंबईतील धारावी येथे मुंबई महापालिकेने केलेल्या कामगिरीचे कौतुक WHO ने केल्याची त्यांनी आठवण करून दिली. देशाचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी वरळीचे आमदार म्हणून त्याक्षेत्रात काम करणाऱ्या आदित्य ठाकरे यांचे कौतुक केले असल्याचेही सभागृहात सांगितले. राज्यात कोरोना तपासणीसाठीच्या लॅबची संख्या वाढवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, आपली आई आणि आपला भाऊ दोघे कोरोनाग्रस्त असून रुग्णालयात उपचार घेत असल्याचेही ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post