कोविड सेंटरमध्ये सुविधा द्या.. नाहीतर आंदोलनाची तरी परवानगी द्या; केडगावच्या सेना नगरसेवकांचा पवित्रा


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
केडगाव येथे महापालिकेने सुरू केलेल्या कोविड सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना पिण्यासाठी साधे पाणीही महापालिकेद्वारे पुरवले जात नाही, पुरेशा वैद्यकीय सुविधाही नाहीत. त्यामुळे येत्या २ दिवसात या सुविधा दिल्या नाही तर महापालिकेत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा केडगावमधील शिवसेनेच्या नगरसेवकांनी दिला आहे. एवढेच नव्हे तर केडगावच्या कोविड सेंटरमध्ये सुविधा मिळण्यासाठी नगर-पुणे रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. तसे पत्र शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्यासह सेना नगरसेवक सुनीता कोतकर, शांताबाई शिंदे, विजय पठारे व अमोल येवले यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना दिले आहे.

केडगावला कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने त्यांना उपचारांची सुविधा होण्यासाठी महापालिकेने केडगावला कोविड सेंटर सुरू केले आहे. पण या सेंटरमध्ये पुरेशा सुविधा नसल्याचे म्हणणे शिवसेना नगरसेवकांचे आहे. रुग्ण तपासणीसाठी कमीतकमी १ डॉक्टर, एक फार्मासिस्ट, ५-६ परिचारिका व स्वच्छता कर्मचारी गरजेचे असताना येथे असा वैद्यकीय स्टाफ दिला गेलेला नाही तसेच या सेंटरमध्ये वैद्यकीय उपकरणे नाहीत, अत्यावश्यक सेवेसाठी ऑक्सिजन सुविधा नाहीत, साधे पिण्याचे पाणी नाही. यासंदर्भात केलेल्या तक्रारींची व मागण्यांची अजूनही दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे २ दिवसात या सुविधा मिळाल्या नाही तर ठिय्या आंदोलन केले जाईल तसेच नगर-पुणे महामार्गावर रस्ता रोको करण्यासाठीही प्रशासनाने आम्हाला परवानगी द्यावी, अशी मागणीही या नगरसेवकांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post