ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात रेस्टॉरंट सुरू होण्याचे संकेत


एएमसी मिरर वेब टीम
मुंबई : राज्याची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टप्प्याटप्प्याने लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले आहेत. राज्यातील हॉटेल, लॉज यांना पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची परवानगी दिल्यानंतर, आता रेस्टॉरंटही ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू करण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. सरकारने रेस्टॉरंटसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. ती सर्वांना पाठवण्यात आली असून, ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेस्टॉरंट व्यावसायिकांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत दिली.

व्यवहार बंद ठेवणे हा आवडीचा विषय असू शकत नाही. त्यामुळे कर रूपात राज्य सरकारला मिळणारा महसूलही बंद आहे. केंद्र सरकारकडून जीएसटीची काही हजार कोटी रुपयांची रक्कम मिळणे आहे. या सर्व आर्थिक अडचणींची सरकारला जाणीव असल्याने मर्यादा पाळून आणि जबाबदारीचे भान ठेवून व्यवहार सुरळीत करण्याचा आपला प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर येथील रेस्टॉरंट व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिधींनीसोबत चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोनाचे संकट मोठे आहे. या संकट काळातही हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिक सरकारसोबत असल्याचे समाधान आहे. कोरोनासोबत जगताना अत्यंत काळजीपूर्वक पुढे जावे लागत आहे. आर्थिक बाबींसाठी काही पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत बंद असलेले अनेक व्यवहार एकेक करून सुरू करत आहोत. 

बैठकीला पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांच्या आहार संघटनेचे शिवानंद शेट्टी, एनआरएआर संघटनेचे अनुराग कटरियार, गुरबक्ष सिंह कोहली, महाराष्ट्र हॉटेल फेडरेशनचे सतीश शेट्टी, प्रदीप शेट्टी, दिलीप दतवाणी, रियाज अमलानी, प्रणव रुंगटा, सुकेश शेट्टी एस.के भाटिया आदी मान्यवर उपस्थित होते

रेस्टॉरंटची सुरक्षितता आणि स्वच्छता महत्त्वाची
उत्सव आणि पावसाचे दिवस आहेत गर्दी होत असताना लोकांचा संयम हा देखील महत्त्वाचा विषय आहे. कोरोनासोबत जगताना प्रत्येकाला आपल्या जीवनशैलीत बदल करावा लागणार आहे. मास्क लावणे, हात धुणे, शारीरिक अंतर राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रेस्टॉरंट सुरू करताना या तीनही गोष्टींची अत्यंत काळजी घेणे अत्यावश्‍यक करणार आहे. रेस्टॉरंटमध्ये विशेष सेवा देणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांची आरोग्यविषयक काळजी घ्यावी लागणार आहे. त्यांनी मास्क लावणे हात धुणे गरजेचे आहे. रेस्टॉरंटची सुरक्षितता आणि स्वच्छता या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या राहणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

एसओपीचे पालन हीच तुमची रेसिपी असेल
एसओपीचे पालन, स्वच्छता, सुरक्षितता, शारीरिक अंतर पाळणे हीच रेस्टॉरंट साठीची रेसिपी आहे. आपले नाते विश्वासाचे असल्याने महाराष्ट्राला आपले कुटुंब मानणारी प्रत्येक व्यक्ती जबाबदारीचे भान ठेवून यात सहभागी होईल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

आणखी एका बैठकीनंतर एसओपी अंतिम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांनी एकत्रित बसून मार्गदर्शक तत्त्वे अंतिम करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी सर्व रेस्टॉरंट व्यावसायिकांची पुन्हा एकदा बैठक घेऊन एसओपी अंतिम करू असे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post