शिक्षक.. काही असे-तर काही तसे.. काही प्रश्न व फायद्यात अडकलेले..


श्रीराम जोशी
एएमसी मिरर वेब टीम

अहमदनगर : अंगठ्यापासून सही करायला शिकवणारे गुरू व सहीपासून अंगठ्यापर्यंत नेणारी टेक्नॉलॉजी....या दोन्ही गुरूंना सलाम ठोकणारा शनिवारचा शिक्षक दिन सोशल मिडियातून जोरात गाजला. कोणी आपल्या काळातील गुरुजनांची आठवण काढून त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त केली तर कोणी आजकालच्या हायफाय गुरूंबद्दल (शिक्षक) टीकाटिपण्णीत रस घेतला. कोणी नगरच्या प्राथमिक शिक्षक बँक व माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वार्षिक सभांतील शिक्षकांचे धुंद वर्तन-शिवीगाळी व हाणामारी चर्चेत आणली तर कोणी ग्रामीण व शहरी भागातील प्रयोगशील शिक्षकांच्या शिक्षण प्रयोगांची माहिती दिली. शिक्षकांच्या सर्वगुण संपन्नतेचा धांडोळा सोशल मिडियावर रंगला असताना त्यात तीन प्रतिक्रिया लक्ष वेधून गेल्या. कोरोनाच्या काळातील शिक्षकांचे वर्तन व हतबल शिक्षण व्यवस्था, विद्यार्थ्यांच्या यशात स्वतःचे यश पाहणारे गुरुजन व तिसरी म्हणजे नामवंत शिक्षक संघटनेच्या नेत्याने सध्याच्या कोविडच्या काळात शिक्षकांनी भावी पिढी कशी घडवावी यावर मार्गदर्शन करण्याऐवजी आपले म्हणजे शिक्षकांचे पेन्शनपासूनचे कोणते प्रश्न प्रलंबित आहेत व ते सोडवण्य़ासाठी आपली संघटना काय पाठपुरावा करते आहे, यावर भाष्य करण्यास प्राधान्य दिले. अर्थात प्रश्नांची सोडवणूक व आर्थिक फायदा प्रत्येकालाच गरजेचा झाला आहे. पण कोरोनाच्या काळात भारत देशच नाही तर आख्खे जग चिंताक्रांत असताना रोजगार-उत्पन्न साधने अडचणीत असताना आपले प्रश्न व समस्या थोड्या बाजूला ठेवून समाजाला किंवा विद्यार्थ्यांना कोविडच्या सावटापासून दूर राखण्यासाठी शिक्षकांनी काय कर्तव्य बजावायला हवे, यावर तरी संघटनांच्या नेत्यांचे भाष्य अपेक्षित होते. शिक्षक दिनाच्या अशा तीन तऱ्हेच्या तीन प्रतिक्रियांच्या अनुषंगाने शिक्षक दिनाची आजची स्थिती स्पष्ट झाली. पण समाज कोणत्या दिशेने जात आहे व शिक्षक त्यात काय योगदान देत आहेत, याचेही स्पष्टीकरण झाले व ते जास्त अस्वस्थ करून गेले.

त्यांची गैरहजेरी मांडणार कोण...
नगर शहरातील काही विद्यालयांतील काही शिक्षक मार्चमधील लॉकडाऊनपासून शाळेत गैरहजर आहेत. या शिक्षकांची गैरहजेरी मांडणार कोण असा प्रश्न मुख्याध्यापकांसमोर आहे. कारण, गैरहजर राहण्याचे कारण सांगितले जाते ते आमचा भाग (म्हणजे ते शिक्षक राहतात तो भाग) कोरोना कन्टेन्मेंट झोन आहे, किंवा मग आम्ही आजारी आहोत, घरात कोणाला तरी त्रास होतोय....अशा कारणांमुळे मुख्याध्यापकही अशा शिक्षकांना शाळेत बोलावण्यास धजावत नाहीत. घरी राहूनच विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकवण्याची सूचना देतात, ती अगदी आनंदाने मानली जाते. पण प्रत्यक्षात किती शिक्षक घरून स्वतःच्या मोबाईलद्वारे वा लॅपटॉप-कॉम्प्युटरद्वारे किती विद्यार्थ्यांना रोज शिकवतात, याची खातरजमा करणे वा तपासणी करण्याची काही यंत्रणाच नाही. सारे कसे रामभरोसे सुरू आहे व गैरहजर शिक्षकांचा घरी राहूनही पगार मात्र सुरूच आहे. शिक्षणाधिकाऱ्यांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे, पण अर्थात तेही काही करू शकत नाहीत. कन्टेन्मेंट झोन, आजारपण वा अन्य अनुषंगिक कारणे शिक्षकांकडून आल्यावर तेही कोरोनाच्या काळात रिस्क नको म्हणून शिक्षकांना सक्तीने शाळेत बोलावण्यास धजावत नाहीत. शाळा प्रवेशाची काळजी न घेणारे, दहावी-बारावीचा निकाल देण्यास न येणारे आणि ऑनलाइन वर्ग शाळेत येऊन न घेणारे शिक्षक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करताहेत पण त्याबद्दल शिक्षक संघटना असो वा शिक्षण व्यवस्था प्रशासन असो, सर्वांनी चिडीचूप धोरण बाळगले आहे. आमचा भाग क्वारंटाइन केल्याचा खोटा बहाणा करीत शिक्षक सप्टेंबर उजाडला तरी सुटीची मजा करताहेत. व शाळेत नियमित येणाऱ्या शिक्षकांना मात्र अतिरिक्त कामाची सजा भोगावी लागत आहे. शाळेत येण्याची सक्ती असताना मे महिन्याच्या सुट्टीपासून आता सुरू असलेल्या सप्टेंब महिन्याच्या आजच्या तारखेपर्यत शाळेत न आलेल्या काही शिक्षिका आहेत. शिक्षिकांना सक्तीने बोलावता येत नसल्याचा गैरफायदाच यातून घेतला जात आहे. पगार मात्र हक्काने जमा करवून घेतला जातो. यंदा अॅडमिशनची जबाबदारीही अनेक शिक्षक-शिक्षकांनी शाळेत येऊन पार पाडलेली नाही, असेही सांगितले जाते. आजारी असल्याचे सर्टिफिकेट कसेही मिळते, शिवाय सध्याच्या काळात आजारपण म्हणजे कोणीच विषाची परीक्षा पाहण्याच्या मनःस्थितीत नाही. आमचा एरिया सील आहे, एवढे जरी सांगितले तरी तो खरेच आहे का नाही, हे फारसे कोणी तपासत नाही. परिणामी, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, एक-दोन क्लार्क शाळांतून दिसतात. कोरोनामुळे शाळांतून विद्यार्थी येत नाहीत, त्यामुळे शिक्षकही फिरकत नाही. शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाला हजेरी मात्र अनेकजण लावून गेले. अशा सगळ्या स्थितीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीबद्दल कोणीही काही बोलत नाही, याची खंत अनेक संवेदनशील पालक आवर्जून व्यक्त करतात व सोशल मिडियातूनही मांडतात. त्याला लाईक मिळतेय, पण सोल्युशन कोणीही देत नाही...

काहींना आहे शिक्षक असल्याचा अभिमान...

बहुतांश शिक्षक खेड्यापाड्यात शिकले घडले. त्यांनी शहरी मुलांनाही घडवले व खेड्यातील मुलांनाही. सर... बाई.. मुलांचे कायम आदर्श राहिले आहेत. म्हणून तर त्यांच्या घरी मुलांची कायम गर्दी असते. हे सारं असं होतं...मग अभिमान वाटू लागतो, मी शिक्षक असल्याचा. आचार्य चाणक्य शिक्षक होते, सावित्रीबाई शिक्षिका होत्या, महात्मा फुले शिक्षक होते, नामदार गोखले शिक्षक होते, केशवसूत शिक्षक होते, डॉ. ए.पी.जे. कलाम-आचार्य अत्रे शिक्षक होते, ताराबाई मोडक, अनुताई वाघ शिक्षिका होत्या, साने गुरुजी शिक्षक होते...आज मीही शिक्षक आहे व अभिमान आहे. वर्गाचा फुलोरा करणं शिक्षकाला छान जमतं. मुलांच्या सहवासात विषय फुलतात आणि.... दिवस इकडचा तिकडं कधी होतो कळतही नाही. मुलांप्रमाणे आपणही रोज शाळेत जातो. मी शाळेत आहे... शाळेत जात आहे..... हे सांगणं किती मस्त वाटतं. मी कामाला जात नाही. कधीच नाही. शाळेतच जातो. कायम जातो. मलाही मुलांसारख्या सुट्ट्या असतात. माझ्या वर्गाने सामना जिंकला की मीही उड्या मारतो किंवा मारते...विशेष दिवस असतील तर मुलांप्रमाणे आम्हीही नटतो. एकदम....कडक. बाईंचा गजरा मुलींसाठी कवतुकाचा विषय असतो. नव्या कोऱ्या पोताची परीट घडीची साडी शाळेतील बाई आणि आई यांनाच शोभून दिसते. कंबरेला पदर खोवून बाई जेव्हा खो देतात तेव्हा त्या...मुलांमध्ये मूल होऊन जातात. बाह्या सावरून विजयी मुद्रेने कबड्डी.. कबड्डी म्हणत सर मैदानात उतरतात... आणि मुलांकडून मस्त पकडले जातात तेव्हा तेही मनसोक्त हसतात. जगण्याचा उत्सव हा मुलांमुळे शिक्षकांना प्राप्त होतो. निरोपाच्या वेळी मुलांसाठी व्याकुळ फक्त शिक्षकच होऊ शकतात. काय असतात यांचे ऋणानुबंध, कळत नाही. शिक्षक असल्याचं आपण कोणासही सांगून बघा. त्यांच्या भुवया कवतुकानं उंचावतात. थोडा हेवा वाटतो. काश, मै भी टिचर होता. येतंच त्यांच्या मनात. का येऊ नये... इतकी चैतन्यदायी सेवा दुसऱ्या कोणाच्या नशिबी नाही. वर्गातील प्रत्येक मूल हे निरागस देवरूप आहे आणि आम्ही सेवक आहोत. आपण मुलांमध्ये खूप छान रमतो. मनात कायम या मुलांच्या आठवणी. त्यांच्या सहवासातील दिवस अधूनमधून कायम आठवतात. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, म्हणून मी एक शिक्षक आहे!...सोशल मिडियातून संवेदनशील शिक्षकांचे हे चित्रही शिक्षक दिनी दाद मिळवून जाणारे ठरले.

प्रश्न व समस्यांमध्ये अडकली संघटना

शिक्षक दिनानिमित्त एका प्रसिद्ध शिक्षक संघटनेच्या नेत्याने प्रश्न व समस्यांमध्ये शिक्षक कसे अडकले आहेत व त्यांना त्यातून सोडवण्यासाठी संघटना काय करते आहे, याची माहिती शिक्षकांपर्यंत देण्यास त्यांचे प्राधान्य राहिले. त्यांच्या म्हणण्यानुसार नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण आल्यावर संच मान्यतेबाबत राज्य सरकारच्या शिक्षण आयुक्तांनी नवे आदेश जारी केले व २००५ पूर्वी टप्पेवारीनुसार विनाअनुदानित शाळांवर काम करणारे शिक्षक नैसर्गिक न्यायाने जुन्या पेन्शन योजनेला पात्र असूनही त्यांना त्यापासून वंचित ठेवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. अघोषित विनाअनुदानित शाळांना घोषित करून त्यांना अनुदान देण्याचा निर्णय सरकारने अद्याप घेतलेला नाही. २० टक्के अनुदानप्राप्त शाळांना अनुदानाचे पुढचे टप्पे अजूनही मिळाले नाहीत. शिक्षकांना अशैक्षणिक कामे कायम आहेत. २००५ नंतर नोकरीस लागलेले शिक्षक व कर्मचारी यांची कपात व त्याबाबतच्या हिशेब स्लिपा अद्याप मिळालेल्या नाहीत. कमी पटामुळे शिक्षकांच्या डोक्यावर सरप्लसची टांगती तलवार कायम आहे. कमी विद्यार्थी संख्या (पट) असलेल्या शाळा बंद होण्याचा धोका कायम आहे. शिक्षणात परदेशी संस्थांचा शिरकाव करण्यास सरकारने परवानगी दिल्याने तसेच शिक्षण संस्थांना स्वायत्तता बहाल करण्याच्या नावाखाली सरकार आपली जबाबदारी झटकत आहे. शिक्षण क्षेत्रात घुसलेला भ्रष्टाचाराचा विषाणू शिक्षण व्यवस्थेचे पावित्र्य नष्ट करू पाहत आहे, असा सूर त्यांच्या म्हणण्याचा आहे. कोरोना साथीमुळे शाळा बंद आहेत, विद्यार्थी घरी आहेत. गेले सहा महिन्यांपासून ही कोंडी आहे. आधी कोरोना साथ नियंत्रण ड्युटी आणि आता ऑनलाईन शाळा यात शिक्षक व्यस्त आहेत. अशा स्थितीत विद्यार्थी, शाळा आणि सहकारी शिक्षक यांच्याशिवाय शिक्षक दिन साजरा होत असताना शिक्षकाच्या मनाची घालमेल होणे स्वाभाविक असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post