परीक्षांचा निकाल नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात


एएमसी मिरर वेब टीम
मुंबई : विद्यापीठ अनुदान आयोगाने अंतिम वर्षांची परीक्षा घेण्यासाठी महाराष्ट्रातील विद्यापीठांना ३१ ऑक्टोबपर्यंत मुदत दिली असून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत निकाल जाहीर करण्याची सूचनाही दिली आहे. 

अंतिम वर्षांची परीक्षा घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने २८ ऑगस्ट रोजी दिले. आयोगाच्या ६ जुलैच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यापीठांना ही परीक्षा प्रक्रिया ३० सप्टेंबपर्यंत पूर्ण करणे बंधनकारक होते. मात्र याच निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने ज्या राज्यांना ३० सप्टेंबपर्यंत परीक्षा घेणे शक्य नाही, अशा राज्यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा आधार घेत परीक्षा पुढे ढकलण्याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाकडे परवानगी मागावी, असेही सांगितले होते. त्यानुसार शासनाने आयोगाकडे मुदतवाढ मागितली होती. आयोगाने ही मुदतवाढ मंजूर केली. आता राज्यातील विद्यापीठांना ३१ ऑक्टोबपर्यंत परीक्षा घेण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. परीक्षा सुरू असतानाच मूल्यांकनाचे कामही सुरू करावे, जेणेकरून निकाल नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जाहीर करणे शक्य होईल. निकाल वेळेत जाहीर झाल्यास पुढील प्रवेश प्रक्रियाही तात्काळ सुरू करता येईल, असे आयोगाने म्हटले आहे. 

परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत सध्या राज्यातील विद्यापीठांचा दौरा करून आढावा घेत आहेत. श्रीमती नाथीबाई ठाकरसी महिला विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठाच्या तयारीचा आढावा सामंत यांनी गुरूवारी घेतला. मुंबई विद्यापीठातील काही विद्यार्थी परीक्षा अर्ज भरू शकलेले नाहीत. त्यांना विशेष बाब म्हणून विद्यापीठाने १८ ते २० सप्टेंबपर्यंत वाढीव कालावधी दिला आहे. अंतिम वर्षांच्या विद्यार्थांना विद्यापीठाकडून सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिली जाणार आहे, असे सामंत यांनी आढावा बैठकीनंतर सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post