बलात्काराच्या घटना थांबेनात; गुरुग्रामध्ये २५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार

 

एएमसी मिरर वेब टीम
नवी दिल्ली :
गुरुग्राममधील एका २५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे. ही घटना गुरुग्रामधील डीएलएफ फेज २ परिसरातील एका रियल इस्टेट डीलरच्या कार्यालयात ही धक्कादायक घटना घडली आहे. अत्याचार करतेवेळी या महिलेस अमानुष मारहाण देखील केली गेली. यामुळे ही महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच, या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या चौघांपैकी तीन जण हे फुड डिलेव्हरी सर्विस कंपनीत कामाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ही घटना दीड वाजेच्या सुमारास घडली. जेव्हा दिल्लीत राहणारी ही महिला सिकंदरपूर मेट्रो स्थानकावर उभी होती. महिलेने सांगितल्याप्रमाणे ती सर्वप्रथम एका व्यक्तीला भेटली व त्याच्यासोबत चर्चा झाल्यानंतर ती त्याच्या दुचाकीवर बसून डीएलएफ फेज २ येथील कार्यालयात गेली. ज्या ठिकाणी तो हेल्पर व क्लिनर म्हणून काम करत होता.

पोलिसांना महिलेने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा ती महिला त्या ठिकाणी पोहचली. तेव्हा अगोदरपासून त्या व्यक्तीचे तीन मित्र त्या ठिकाणी उपस्थित होते. हे पाहून तिला असुरक्षित वाटू लागल्याने ती त्या ठिकाणाहून निघण्याचा प्रयत्न करू लागली. मात्र त्या चौघांनी तिला जाऊ दिले नाही. यानंतर त्यांनी तिला धमकावत व मारहाण करत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्या चौघांनी तिला लाथा बुक्यांनी मारहाण केली. शिवाय तिचं डोकं भिंतीवर व फरशीवर देखील आपटल्याने ती गंभीर जखमी झाली.

या घटनेनंतर त्या चौघांनी महिलेला रस्त्यावर सोडले व ऑफिस बंद करून दुचाकीद्वारे घटनास्थळावरून पळ काढला. गंभीर जखमी अवस्थेतील महिलेला पाहून काही खासगी सुरक्षा रक्षकांनी याबाबत पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी या महिलेस खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post