पाकिस्तानात घडतात, ते प्रकार उत्तर प्रदेशात घडले!


एएमसी मिरर वेब टीम
मुंबई : ‘बेटी बचाव’च्या नारेबाजीत एका बेटीवर बलात्कार व हत्या झाली. हिंदू मुलींना पळवून बलात्कार व हत्या करण्याचे प्रकार पाकिस्तानात घडतात. ते सर्व आता उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये घडले. राहुल गांधींना धक्काबुक्की झाली. हे कसले स्वातंत्र्य! एका नटीसाठी एक कायदा, बेटीचा देह मात्र विटंबना करून जाळला जातो, अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी 'रोखठोक' टीका केली आहे.

'सामना'च्या रोखठोक सदरात 
काय म्हटलेय राऊतांनी, वाचा पूर्ण लेख..

मनीषा वाल्मीकी कोण? तिचे काय झाले? हे आता निदान अर्ध्या जगाला कळले आहे. मुंबईत एका नटीचे बेकायदेशीर बांधलेले ऑफिस तोडले म्हणून ज्यांना न्याय, अन्याय, महिलांवरील अत्याचाराच्या उचक्या लागल्या ते सर्व लोक मनीषाच्या बेकायदेशीर पेटवलेल्या चितेबाबत थंड आहेत.

19 वर्षांची मनीषा. उत्तर प्रदेशातील हाथरस येथे चार गुंडांनी तिच्यावर बलात्कार केला. नंतर तिच्यावर निर्घृण हल्ला केला. त्यात ती मरण पावली. ‘बेटी बचाव’वाल्यांच्या ढोंगी रामराज्यात एक बेटी ‘बचाव… बचाव’ असा आक्रोश करीत तडफडून मेली.

मनीषाला न्याय मिळावा म्हणून सुशांतप्रमाणे कोणी प्रखर आंदोलन चालवले नाही. नटी कंगनाच्या घरावर हातोडा पडताच ‘काय हा अन्याय?’ असे बोंबलणारा ‘मीडिया’देखील कंठशोष करताना दिसला नाही. का?

मनीषा – ड्रग्ज घेत नव्हती.
मनीषा – स्टार किंवा सेलिब्रेटी नव्हती.
मनीषा – झोपडीत राहत होती व तिने कोटय़वधी रुपये खर्च करून कोणतेही बेकायदेशीर बांधकाम केले नव्हते. तिचे कोणाबरोबर ‘अफेयर’ नव्हते. ती एक साधी सरळ मुलगी होती. त्यामुळे तिच्या देहाची रात्रीच्या अंधारात बेकायदेशीर चिता पेटवून राख करण्यात आली. हे सर्व योगींच्या रामराज्यात म्हणजे उत्तर प्रदेशात घडले. अशा घटना अधूनमधून पाकिस्तानात घडत असतात. हिंदूंच्या मुलींना जबरदस्तीने पळवून, बलात्कार करून त्यांना मारून फेकले जाते. हाथरसला वेगळे काय घडले? पण हाथरसला कुणी ‘पाकिस्तान’ म्हटल्याचे अजून तरी दिसले नाही!

ही लक्तरेच!
बलात्कारपीडित महिलेचे नाव समोर आणू नये हे संकेत आहेत. पण ते तिच्या इस्पितळातील छायाचित्रांसह समोर आले आहे. हिमाचलच्या एका नटीच्या बेताल वक्तव्यामागे, बेकायदेशीर कृत्यांमागे जे महान महात्म्ये उभे राहिले ते हाथरस बलात्कार प्रकरणात साफ अदृश्य झाले. या सर्व प्रकारात अनेक महिला नेत्या, त्यांच्या संस्था आणि संघटना जणू मूकबधीर होऊन बसल्या आहेत.

महिनाभरापूर्वी पंतप्रधान मोदी अयोध्येत आले. रामजन्मभूमीची त्यांनी पूजा केली. त्यावेळी तेथे श्रीरामाबरोबर सीतामाईचाही वावर होता. पण त्याच भूमीवर एक नवी निर्भया स्वतःच्या शरीराची लक्तरे उघडय़ावर टाकून तडफडून मेली. हे सर्व त्याच उत्तर प्रदेशात घडले. तेथे भारतीय जनता पक्षाचे राज्य आहे हे सोडा. पण अशा प्रकारची घटना महाराष्ट्रासारख्या राज्यात घडली असती तर एवढ्यात सरकार बरखास्तीची, राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी झालीच असती. राष्ट्रीय महिला आयोग हे नक्की काय प्रकरण आहे ते समजत नाही. कंगना राणावत हिने महाराष्ट्रविरोधी वक्तव्य केले तर शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या तिचे थोबाड फोडतील, असे आमदार प्रताप सरनाईक म्हणाले. यावर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी कंगनाच्या सन्मानाचा, सुरक्षेचा मुद्दा समोर आणला. श्री. सरनाईक यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली. तोच महिला आयोग ‘हाथरस’ प्रकरणात चूप बसला. हाथरसच्या बलात्कार पीडितेचा आक्रोश दिल्लीपर्यंत पोहोचूनही काहीच केले नाही. हा सर्वच प्रकार धक्कादायक आहे. 

रामराज्य हे असे
उत्तर प्रदेशात ‘रामराज्य’ आहेच. तेथे आता एक हजार एकरवर फिल्मसिटी उभारली जात आहे. त्यामुळे चित्रपटसृष्टीतील अनेक राण्या-महाराण्या यापुढे लखनौ, कानपूरलाच मुक्कामास जातील. यापैकी एखाद्या राणीने ‘योगीराज’ला पाकिस्तान किंवा जंगलराजची उपमा दिली तरी तेथले भाजप कार्यकर्ते संयमाने घेतील व एखाद्या राणीचे बेकायदेशीर बांधकाम तोडायला सरकारी फौजफाटा पाठवणार नाहीत. कारण महिलांचा सन्मान आणि सुरक्षा हा विषय महत्त्वाचा. पण ‘हाथरस’सारख्या निर्घृण प्रकरणानंतरही सरकारने हाच संयम दाखवला. त्या पीडितेला मरू दिले. रामराज्यात जणू एक सीतामाईच तडफडून मरण पावली. 14 सप्टेंबरला सकाळी 9.30 वाजता पीडित मुलगी आपल्या भावाबरोबर पोलीस ठाण्यात पोहोचली. बलात्कार व गळा दाबून मारण्याचा प्रयत्न झाल्याचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्या मुलीस लगेच इस्पितळात भरती केले. 29 सप्टेंबरला तिचे दिल्लीत निधन झाले. मंगळवारी मुलीचे निधन होताच दिल्लीच्या सफदरजंग इस्पितळाबाहेर लोक जमले. धरणे आंदोलन सुरू झाले. उत्तर प्रदेशात त्याच्या ठिणग्या उडाल्या. पोलिसांनी त्या मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला. दिल्लीपासून 200 किलोमीटर दूर हाथरस येथे पहाटे पोलिसांनीच गुपचूप तिची चिता पेटवली. तिच्या नातेवाईकांना घरातच कोंडून ठेवले. ऍम्बुलन्समधून मुलीचा मृतदेह जाळण्यासाठी नेत आहेत हे समजताच त्या मुलीच्या आईने स्वतःला ऍम्बुलन्सवर झोकून दिले. तेव्हा पोलिसांनी तिला फरफटत दूर नेले.
हे एवढे भय, एवढी दहशत, इतकी अमानुषता कशासाठी?

न्याय कसा मिळतो
महिलांना न्याय त्यांचे समाजातील स्थान पाहून मिळतो काय? देशातल्या मीडियावरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारे हे प्रकरण आहे. कंगना प्रकरणात महिनाभर संपूर्ण मीडियास ‘न्याय द्या’ या प्रेरणेने पछाडले होते. वृत्तवाहिन्यांवर दुसरा कोणताच विषय नव्हता. काही चॅनेलचे अँकर्स उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व व्यक्तिशः मला प्रश्न विचारीत होते. त्याआधी सुशांत आत्महत्या प्रकरणात तेच घडले; पण हेच कोकलणारे लोक ‘हाथरस’ प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाला, केंद्र सरकारला, योगी सरकारला प्रश्न विचारताना दिसत नाहीत. जणू हाथरसच्या त्या अबलेने स्वतःच्या इच्छेने पुष्पक विमानातून स्वर्गारोहण केले. रात्रीच्या अंधारात पोलिसांनी लपूनछपून दडपून केलेले त्या मुलीवरील अंत्यसंस्कार दिसले नाहीत. संपूर्ण मीडियाने ‘बॉलीवूड’मध्ये कोण कोण ड्रग्ज घेत आहे याचा पंचनामा रोज केला, पण हाथरस कन्येचा आक्रोश त्यांच्या कानाचा पडदा फाडू शकला नाही.

दिल्लीतले निर्भयाकांड

2012 साली दिल्लीत ‘निर्भया’ बलात्कारकांड घडले तेव्हा संपूर्ण भाजपा रस्त्यावर उतरला होता. संसद बंद पाडली होती. मीडियाने निर्भयासाठी ‘न्याय’ देणारी यंत्रणाच उभारली होती. निर्भया तेव्हा सगळय़ांचीच बहीण व मुलगी झाली. मग हाथरसची कन्या ‘अस्पृश्य’ का राहिली? की ती दलित असल्यामुळेच न्यायापासून वंचित राहिली? रामदास आठवले हे सध्या विनोदाचा विषय ठरत आहेत. ते कंगना राणावतला घरी जाऊन भेटले व त्यांचे कार्यकर्ते आधी विमानतळावर तिच्या स्वागतासाठी पोहोचले, पायल घोष या नटीस घेऊन ते राज्यपालांना भेटले. मात्र हाथरसची एक दलित कन्या मृत्यूशी झुंज देत होती, तिच्यावर अत्याचार झाला; तेव्हा आयुष्यमान आठवले नटय़ांच्या घोळक्यात भलतेच उद्योग करीत होते. देशातील दलित चळवळ, आंबेडकरी विचारांचा हा विध्वंस आहे.

प्रकरण दाबलं!

देशाच्या एका कन्येचा बलात्कार करून हत्या केली. ती जेव्हा जिवंत होती तेव्हा तिला सुरक्षा पुरवली नाही. तिच्यावर हल्ला झाला तेव्हा वेळीच उपचार करू दिले नाहीत. सत्य आणि तिचा आक्रोश दडपण्याचा प्रयत्न झाला. मीडियाने हे सर्व प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला तेव्हा रोहिणी सिंग ही सामाजिक कार्यकर्ती त्या मुलीच्या वेदनेचा आवाज बनून लोकांसमोर आली. तेव्हा त्या रोहिणीलाही उत्तर प्रदेश पोलिसांकडून धमकवण्यात आले. सध्या अशा विषयांना कोणी वाचा फोडत नाहीत. जे पुढे येऊन बोलतात त्यांना धमकावले जाते. जे हाथरसच्या मुलीबाबत घडले.

हाथरसला जे घडले त्यामुळे देशाची परंपरा, संस्कृतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काँगेसचे नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी या पीडित मुलीच्या कुटुंबास भेटायला निघाले तेव्हा त्यांना पोलिसांनी फक्त अडवले असे नाही, तर त्यांची कॉलर पकडून खाली पाडले, असभ्यपणे धक्काबुक्की केली. ज्या इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले व देशाच्या अखंडतेसाठी बलिदान दिले, श्री. राहुल गांधी हे त्यांचे नातू आहेत एवढे भान तरी कॉलर पकडणाऱयांनी ठेवायलाच हवे होते. एका ‘निर्भया’साठी कधीकाळी देश रस्त्यावर उतरला होता हे इतक्या लवकर मोदींचे सरकार विसरून गेले. 2014 ते 2019 या काळात 12,257 गँगरेप उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा, मध्य प्रदेश या चार राज्यांत झाले आहेत, पण जात, धर्म, राजकीय प्रतिष्ठा पाहून अशा प्रकरणांत न्याय केला जातो.

एका नटीची बेकायदा भिंत पाडली म्हणून किंचाळणारा समाज एका ‘बेटी’वर बलात्कार, हत्या होऊनही शांत आहे. भावनेचा कडेलोट आणि कायद्याचे वस्त्रहरण झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post