अहमदनगर : सोशल मीडियात अफवांचे वादळ


एएमसी मिरर ऑनलाईन न्यूज 
'वादळ वारं सुटलं ग...वाऱ्यानं तुफान उठलं गं'...अस मराठी गाणं प्रसिद्ध आहे व ते आज आठवण्याचा कारण म्हणजे नगर जिल्ह्यात येणारं कथित वादळ व त्यामुळे सोशल मीडियात या वादळाबाबत उलट-सुलट पोस्टद्वारे सुरू असलेले 'बौद्धिक वादळ' अन् अफवा..! कोणी म्हणते असे वादळ येणार, तर कोणी म्हणते ते इकडे फिरकणारच नाही.. अशा परस्परविरोधी पोस्ट पाहून जनता मात्र संभ्रमात आहे. शासनाकडून अधिकृत खुलाशाची जनतेला प्रतीक्षा आहे. टीव्ही चॅनेलवर देशभरातील पावसाची व झालेल्या नुकसानीची माहिती दिली जाते, पण वादळ येणार असल्याचे कोठेही वाच्यता होत नाही. त्यामुळे सोशल मिडियावर घोंघावणारे वादळाचे वादळ खरे की अफवा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय या वादळांच्या पोस्टमुळे जनतेला काळजी घेण्याचे आवाहन करणाऱ्या 'सल्लाबहाद्दरां'च्या पोस्टचाही सुकाळ झाला आहे. त्यामुळे हे वादळापूर्वीचे वादळ चर्चेत आले आहे. तशात सध्या रोज पाऊस सुरू असला तरी त्याचे रौद्ररुप दिसत नसल्याने वादळ आले, तर त्यावेळी पाऊस कसा असेल, याचीही उत्सुकता व्यक्त होत आहे. सोशल मीडियावर या संभाव्य वादळाबद्दल बुधवारी सायंकाळी नवी पोस्ट पडली व हे वादळ दक्षिण दिशेकडे सरकल्याने ते नगर जिल्ह्यात येणार नसल्याचे सांगितले गेेले. सोलापूर व पुणे जिल्ह्यात सध्या या वादळाने धुमाकूळ घातल्याची चर्चा आहे. 

आतापर्यंत अनेक राजकीय वादळे अनुभवलेल्या नगर जिल्ह्यात आता चक्क निसर्ग चक्री वादळ घेऊन येणार असल्याच्या पोस्ट सोशल मिडियातून फिरत आहेत. हवामान तज्ज्ञांचे हवाले देऊन फिरणाऱ्या या पोस्टमध्ये- 'गुरुवारी पहाटे निसर्गाचे चक्रीवादळ नगर जिल्ह्यातील जामखेडमार्गे अरबी समुद्राकडे जाणार आहे व जमिनीवरून जाणारे हे पहिलेच चक्री वादळ असल्याचे सांगितले जाते व त्यामुळे मुसळधार पावसाचीही शक्यता वर्तविली गेली आहे'. पण असे जर झाले तर यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत दीडशे टक्के झालेला पाऊस पावणे दोनशे-दोनशे टक्के म्हणजे दुप्पट होणार आहे व अतिवृष्टीचे नवे जलसंकट जिल्ह्यासमोर उभे ठाकणार आहे. पण, दुसऱ्या तज्ज्ञांच्या मते असे चक्रीवादळ जमिनीवरून काही येणार नाही व त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये, असे सांगितले जात असल्याने नेमके खरे कोणाचे व खोटे कोणाचे, हे वादळ येते की नाही, यावरून स्पष्ट होणार आहे.

वादळ येणार असल्याबाबतच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, जलसंपदा विभागाकडे ब्रिटिश काळापासून गेल्या शंभर वर्षांतील पाऊस व त्याच्या प्रवासाच्या ठळक नोंदी आहेत. मात्र, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले वादळ भूभागावरून प्रवास करीत मुंबईच्या अरबी समुद्रात गेल्याची एकही घटना नोंदलेली नाही. पण आता मंगळवारी (ता. १३) बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून नांदेडमार्गे गुरुवारी पहाटे (ता. १५) जामखेडहून दक्षिण नगर जिल्हा पार करून दुपारपर्यंत मुंबईत पोचेल. दुसऱ्या दिवशी अरबी समुद्रात गेलेले हे चक्रीवादळ रौद्र रूप धारण करील. त्याचा वेग ताशी शंभर किलोमीटरपर्यंत वाढेल. त्यामुळे शनिवारपर्यंत (ता.१७) हवामान ढगाळ व दमट राहील. दक्षिण नगर जिल्ह्यात गुरुवारी (ता.१५) अधिक पावसाची शक्‍यता आहे', असे म्हटले आहे  तर या दाव्याचा प्रतिवाद दुसऱ्या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की, 'वादळ ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. चक्रीवादळाच्या निर्मितीसाठी साधारणपणे आठ ते दहा दिवसांचा म्हणजेच किमान 240 ते 250 तासांचा कालावधी लागतो. चक्रीवादळांच्या निर्मितीची पूर्वकल्पना आपल्याला दहा-बारा दिवस अचूक मिळू शकते. वादळे ही समुद्रात किंवा सागरात निर्माण होतात आणि बाष्पाचा पुरवठा जोपर्यंत होतो, तोपर्यंत ती जिवंत राहतात. जमिनीवर एकदा वादळ धडकले की सागरी बाष्पाचा पुरवठा खंडित होतो. परिणामी ते अत्यंत वेगाने अवघ्या काही मिनिटांत नष्ट होते. त्यामुळे वादळ धडकले तरी सागरी किनारी त्यामुळे हानी होऊ शकते. मात्र, महाराष्ट्रासारख्या राज्यातील अंतर्गत भागात वादळ येऊ शकत नाही. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होऊन विदर्भ नंतर मराठवाडा नंतर पश्चिम वा उत्तर महाराष्ट्र असा प्रवास करीत मुंबईमार्गे ते बंगालच्या उपसागरात 60 किलोमीटर ताशी वेगाने सरकत जाईल आणि 100 वर्षातील ही दुर्मिळ घटना आहे या सर्व अवैज्ञानिक गोष्टी असून असे कधीच होणार नाही. त्यामुळे नागरीकांनी घाबरुन जाऊ नये, तसेच असे अफवा पसरविणारे भीतीदायक मेसेज फॉरवर्ड करू नये, असे स्पष्टपणे हवामान तज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी सांगितले आहे', असा मजकूर या पोस्टमध्ये आहे. त्यामुळे वादळ येणार की नाही, याचा संभ्रम वाढत चालला आहे. शासन वा हवामान खात्याकडूनही याबाबतचे स्पष्टीकरण दिले गेले नसल्याने सध्या तरी सोशल मिडियावर वादळाचे वादळ अन् अफवा सुरू आहेत व प्रत्यक्षात राज्यात सर्वदूर पावसाचेही थैमानही सुरू आहे.

दरम्यान, मागील काही तासांपासुन या वादळाने सोलापूर व पुणे जिल्ह्यात धुमाकुळ घातला असल्याची चर्चा आहे. या भागात पाऊसही जोरात सुरु आहे.

Post a Comment

Previous Post Next Post