'या' नव्या मालिकेत दिसणार 'शेवंता'ची अदा.. अनुष्का मोशनची निर्मिती

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

रात्रीस खेळ चाले...मालिकेतील अण्णा नाईकाची शेवंता म्हणजेच कुमुदिनी पाटणकर आता नगरच्या टीव्ही मालिकेत आपली अदा दाखवणार आहे. नगरच्या अनुष्का मोशन पिक्चर्स संस्थेच्या 'तुझं माझं जमतंय' या नव्या मालिकेत त्या शेवंतासह नगरच्या कलावंतांचा कलाविष्कार रंगणार आहे. ही मालिका प्रेक्षकांना झी युवा वाहिनीवर येत्या ४ नोव्हेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता पाहायला मिळणार आहे.

झी समुहाच्या झी युवा वाहिनीवर सुरु होणारी मालिका म्हणजे शेवंताच्या (अपूर्वा नेमळेकर) चाहत्यांसाठी खूषखबर आहे. कारण या मालिकेद्वारे ती धमाकेदार कमबॅक करणार आहे. शेवंता या नव्या मालिकेत 'पम्मी'ची भूमिका साकारणार आहे. ही एक लाईट कॉमेडी सीरिअल असून यामध्ये तिची भूमिका तितकीच दमदार आणि ग्लॅमरस आहे. अहमदनगर फिल्म कंपनी आणि अनुष्का मोशन पिक्चर्स अ‍ॅण्ड एंटरटेनमेंटसने अस्सल नगरी मातीत तयार होणारी ही मालिका तुझं माझं जमतंय'ची निर्मिती केली आहे. या मालिकेचे चित्रीकरण आणि निर्मिती नगरमध्येच होणार असून विशेष म्हणजे मालिकेसाठी काम करणारे 90% कलावंत व अन्य सहायक नगरचे आहेत. या मालिकेची कथा आणि संकल्पना नगरचे लेखक अमित अशोक खताळ यांची आहे. यात नगरचे कलाकार मोहिनीराज गटणे, राहुल सुराणा, अवंती होशिंग, मेघमाला पाठारे, वैष्णवी घोडके, अमित रेखी, रुपाली मुनोत, चंद्रकांत जाधव, प्रणित मेढे (प्रोजेएक्ट हेड), रवींद्र नवले(कार्यकारी निर्माता), योगेश इंगळे (कला दिग्दर्शक), मयुरी मुनोत-मोरे (वेशभुषा) अंकुश काळे, मंगेश जोंधळे (निर्मिती व्यवस्थापक), अनिरुद्ध तिडके यांच्यासह इतर काहीजणांचा समावेश आहे. नुकतेच या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. या चित्रीकरणात कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यक त्या सर्व गोष्टींचे पालन केले जात आहे.

महाराष्ट्रातील सर्वात मोठी एकांकिका स्पर्धा अहमदनगर महाकरंडक स्पर्धेपासून सुरू झालेला हा प्रवास आधी चित्रपट निर्मिती आणि आता टेलिव्हिजनपर्यंत येऊन पोहोचला आहे. यानिमित्ताने अहमदनगरच्या कलाकारांना मोठे व्यासपीठ आणि करिअरला दिशा मिळत आहे. उद्योजक नरेंद्र फिरोदिया आणि स्वप्नील मुनोत यांची निर्मिती असलेल्या या मालिकेच्या दिग्दर्शनाची जबाबदारी मंदार कुलकर्णी व सह-दिग्दर्शन संदीप दंडवते सांभाळत आहे.

प्रोमोला प्रतिसाद
तडक्याला आहे पम्मी तर होणारच ना लव्हस्टोरी यम्मी... नवीन मालिका "तुझं माझं जमतंय" लवकरच... हे सांगत रिलीज झालेल्या प्रोमोला सर्वच थरातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. प्रोमोमध्ये अपूर्वा नेमळेकर ग्लॅमरचा तडका देताना दिसत आहे. तिच्यासोबत या मालिकेत 'रोशन विचारे' आणि 'मोनिका बागुल' ही जोडी दिसणार आहे. दरम्यान यावर कमेंट आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post