'महाविकास'कडून पराचा कावळा केला जातोय; भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षांचा आरोप


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

संपूर्ण महाराष्ट्राचे चित्र पाहिले तर जेथे जलयुक्त शिवार योजनेची कामे झाली, त्या सर्व ठिकाणी पाण्याचे साठे निर्माण झाले असून त्यामुळे भूजल पातळी वाढली आहे, असा दावा भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य व माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी केला आहे. केवळ देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर आरोप केले जात आहेत. कॅगच्या अहवालात जो उल्लेख आहे, त्यात त्यांनी जलयुक्त शिवाराच्या गावांना भेटी दिल्या नाहीत. मात्र, याच अहवालावरून पराचा कावळा करून आरडाओरडा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याची गरज आहे. मात्र, सरकार त्याकडे दुर्लक्ष करून केवळ जलयुक्त शिवाराची चौकशी लावत असून त्याचा आम्ही निषेध करतो, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजनेच्या एसआयटी चौकशीचे आदेश दिल्यानंतर भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत. भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य व माजी जिल्हाध्यक्ष प्रा. बेरड यांनी थेट जलयुक्त शिवार योजनेच्या कामातून झालेल्या तलावाची परिस्थिती दाखवत राज्य सरकारवर निशाणा साधला. राज्य सरकार हे केवळ देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर आरोप करीत आहे, असा दावा त्यांनी केला. माजी जलसंधारण मंत्री आणि भाजप नेते प्रा. राम शिंदे यांनीही या चौकशीतून काहीच निष्पन्न होणार नाही, असा दावा केला आहे.

प्रा.बेरड यांनी थेट मांडवा (ता.नगर) येथे जाऊन जलयुक्त शिवार योजनेतून काम केलेल्या तलावाला भेट दिली. हा तलाव सध्या पूर्ण क्षमतेने भरला असून त्यामुळे गावातील लोकांना कसा फायदा होतो, असे सांगणारा व्हिडिओच प्रा.बेरड यांनी या तलावासमोर उभे राहात तयार केला व त्याद्वारे त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. यामध्ये प्रा.बेरड यांनी म्हटलयं, नगर तालुक्यातील मांडवा या गावी जलयुक्त शिवार योजनेतून ज्या तलावाचे काम झाले, त्याला आज भेट दिली. यावेळी काही शेतकरी उपस्थित होते. जलयुक्त शिवार योजनेमुळे दुष्काळप्रवण भागात झालेला पाण्याचा साठा या तलावात दिसतोय. यावर्षी चांगला पाऊस झाला आहे. या तलावामध्ये साठलेल्या पाण्यामुळे या गावातील जमिनीची भूजल पातळी वाढणार आहे. पर्यायाने विहिरींना पाणी येईल व या परिसरातील सर्व शेती बारा महिने बागायती होईल, अशा प्रकारचे मोठे काम जलयुक्त शिवारमुळे झाले आहे. मात्र, राज्यातील महाविकास आघाडी सरकारला स्वतःला काही करता येत नाही, त्यामुळेच ते देवेंद्र फडणवीस यांच्या काळात यशस्वीपणे राबवलेल्या महाराष्ट्रातील जलयुक्त शिवार योजनेवर आक्षेप घेण्याचे काम करीत आहेत, अशी टीकाही प्रा.बेरड यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post