महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात भाजपने मंदिर उघडून केली घटस्थापना

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

राज्यात मंदिरे उघडण्यासाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाकरे सरकारच्या विरोधात काही दिवसांपूर्वीच आंदोलने करुन निषेध करण्यात आला होता. आता अहमदनगर जिल्ह्यात भाजप पदाधिकार्‍यांनी केंद्र सरकारच्या आदेशाचा आधार घेत मंदिर उघडून घटस्थापना केली आहे. नगर शहरातील गौरीशंकर मित्र मंडळाने सरकारच्या मंदिरे न उघडण्याचा निर्णयाचा निषेध करत तुळजाभवानी मातेचे मंदिर उघडून विधीवत पूजा केली. तुळजाभवानी मातेने राज्यातील मंदिरे लवकरात लवकर उघडण्याची सद्बुध्दी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना द्यावी, असे म्हणत गुन्हे दाखल केले तरी आता मंदिर बंद करणार नाही, असा इशारा मंडळाचे अध्यक्ष व भाजप नेते वसंत लोढा यांनी दिला आहे.

वसंत लोढा म्हणाले की, राज्यातील आघाडी सरकारने भाविकांच्या भावनांचा विचार न करता नवरात्रीतही मंदिरे बंद ठेवली आहेत. मंदिरे न उघडण्याच्या निर्णयाचा गौरीशंकर मित्र मंडळ ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही निषेध करत आहोत. केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारने देशातील मंदिरे उघडण्याचा आदेश केव्हाच दिला आहे. मात्र, केंद्र सरकारचा एक व राज्य सरकारचा वेगळाच आदेश आहे. नागरिकांनी नक्की आदेश पाळायचा कोणाचा? आम्ही आज केंद्र सरकारने मंदिर उघडण्याचा दिलेल्या आदेशाचे पालन करत घोषणा केल्याप्रमाणे गौरीघुमट येथील तुळजाभवानी मातेचे मंदिर उघडून विधीवत घटस्थापना केली आहे. यानंतरही जर राज्य सरकारने मंदिरे उघडली नाही तर भाविकांच्या सहन शक्तीचा अंत होईल व मोठा उद्रेक राज्यात होईल, असे ते म्हणाले.
शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त गौरीशंकर मित्रमंडळाने तुळजाभवानी मातेच्या मंदिरात शनिवारी सकाळी विधिवत अभिषेक करुन मंडळाचे संस्थापक वसंत लोढा व माजी नगराध्यक्षा लता लोढा यांच्या हस्ते घटस्थापना केली. विविध क्षेत्रातील 11 दाम्पत्यांच्या हस्ते देवीची महाआरती करण्यात आली.

भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक महेंद्र गंधे यांनीही यावेळी आवर्जून हजेरी लावली. ते म्हणाले की, भारतीय जनता पार्टीने गेल्या तीन-चार महिन्यांपासून सातत्याने राज्य सरकारकडे मंदिरे उघडण्याची विनंती करत आंदोलने केली. मात्र गणेशोत्सव गेला, आता नवरात्र उत्सव सुरु झाला, तरीही मंदिरे बंदच आहेत. याचा निषेध करत वसंत लोढा यांनी गौरी घुमट येथील तुळजाभवानी मातेचे मंदिर उघडून घटस्थापना केली. हिंदू भाविक आता शांत बसण्याच्या मन:स्थितीत नाहीत. त्यामुळे सरकारने ताबोडतोब मंदिरे उघडण्याचा निर्णय घ्यावा.

घटस्थापना सोहळ्यास एल.जी.गायकवाड, सदाभाऊ शिंदे, हरिभाऊ डोळसे, बापू ठाणगे, आरती आढाव, शांताराम राऊत, रवीचवंडके, आशुतोष देवी, प्रदिप बोगावत, बाळासाहेब भुजबळ, निलेश लाटे, अशोक कानडे, जयंत येलूलकर, सागर शिंदे, संतोष शिंदे, महेश साळी, संजय वल्लाकट्टी, छाया शिंदे, सुशीला शिंदे, सोनाली चवंडके, संदिप शिंदे आदींसह नागरिक, मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post