यापुढे 'ते' सामाजिक काम करावे की नाही.. चाईल्ड लाईनसमोर प्रश्न


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

पोलिसांच्या कटू अनुभवामुळे यापुढे बालविवाह रोखण्याचा मनःस्ताप करावा की नाही, हा यक्षप्रश्न चाईल्ड लाईन टीम समोर पडला आहे. तसे स्पष्ट भाष्य समन्वयक महेश सूर्यवंशी यांनी केले आहे. दोन दिवसांपूर्वी बालविवाहसंदर्भातील गुन्हा दाखल करण्य़ाबाबत अहमदनगर जिल्ह्यातील सोनई पोलिसांकडून आलेल्या कटू अनुभवाने त्यांनी ही उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या घटनेसंदर्भात सोशल मिडियातून चाईल्ड लाईनचे काम करणारे हानिफ शेख यांनी माहिती दिली आहे व पोलिसांच्या असंवेदनशीलतेमुळे बालविवाह रोखणाऱ्या बालसेवकांची छळवणूक झाल्याचा दावा केला आहे. 

यात त्यांनी म्हटले आहे की, चाईल्ड लाईन संस्थेद्वारे मागील ५ महिन्यात ५७ बालविवाह नगर जिल्ह्यात थांबवण्यात आले. परंतु सोनई पोलिसांच्या नुकत्याच आलेल्या अनुभवामुळे यापुढे मात्र या प्रयत्नांना खीळ बसण्याची शक्यता आहे. नगर चाईल्ड लाईनने यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे, असेही यात स्पष्ट केले गेले आहे. यात पुढे म्हटले आहे की, चाईल्ड लाईनमध्ये १७ ऑक्टोबर रोजी एक ३० वर्षीय महिला स्वतःच्या मुलीचा बालविवाह झाल्याची तक्रार घेऊन आली होती. तिच्या ११ वर्षीय मुलीचा बालविवाह तिच्याच वडिलांनी १५ ऑक्टोबरला लावून दिला, असे तिचे सांगणे होते. त्यामुळे चाईल्ड लाईनचे कार्यकर्ते प्रवीण कदम व पूजा पोपळघट हे दोघे, मुलीची आई, मावशी आणि काका यांना सोबत घेऊन सोनई पोलीस ठाण्यात १९ ऑक्टोबर २०२० रोजी गेले. तेथील ठाणे अंमलदार अंकुश दहिफळे यांना बालविवाहाबद्दल माहिती दिली. मात्र, या घटनेचा तपास करू, परंतु आम्ही गुन्हा लगेच दाखल करू शकत नाही. याबद्दल २ दिवसात तपास करून पुढील कार्यवाही करू, असे सोनई पोलिसांनी सांगितले. येथील पोलीस निरीक्षक वसंत भोये यांनाही या बालाविवाहाबद्दल चाईल्ड लाईन टीमने माहिती दिली. दुपारी १२ पासून ते सायंकाळी ६.३० पर्यंत चाईल्ड लाईन टीम मुलीची आई आणि ग्रामसेवकांसह पोलिसांच्या कारवाईची वाट पाहत होते. ८ तासांनी भोये साहेब आले. त्यांनी चाईल्ड लाईन टीमला विचारले की, तुम्हाला माझ्यापेक्षा कायद्याचे ज्ञान जास्त आहे का, आपण गुन्हा दाखल करायला सांगणारे कोण आहात. मी या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार नाही. यावर टीमने सांगितले की, "आपण ११ वर्षीय मुलीचा बालविवाह झाल्याबद्दल कारवाई न केल्यास तिच्यावर लैंगिक अत्याचार होऊ शकतात. त्यानंतर मुलीला शोधण्यासाठी वरवंडी (ता.राहुरी) येथे पोलीस पथक पाठवण्यात आले. त्यावेळी मुलीची आई, चाईल्ड लाईन टीम मेंबर पूजा पोपळघट आणि पोलीस कर्मचारी सोबत होते. मुलीला सोनई पोलीस ठाण्यात आणले. 

त्यावेळी मुलीने नमूद केले की, तिचे लग्न १५ ऑक्टोबर २०२० रोजी ब्राम्हणगाव (ता.श्रीरामपूर) येथे झाले. त्यानंतर रात्री १०.३० वाजता भोये साहेबांनी सांगितले की, सोनई पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करून घेणार नाही. श्रीरामपूरला जाऊन गुन्हा दाखल करा. यावर चाईल्ड लाईन टीमने शून्य नंबरने फिर्याद दाखल करण्याची विनंती त्यांना केली. त्यास भोये यांनी नकार दिला. टीमने आग्रह धरला की, एवढ्या रात्री ११ वर्षीय बालिकावधू व तिच्या आईस घेऊन जाणार नाही. गुन्ह्याची सुरुवात सोनई येथून झाली असल्याने तेथेच तो नोंदला जावा, असे टीमचे म्हणणे होते. आधी हा बालविवाह होण्यापूर्वी मुलीच्या आईने पोलिसांना लेखी अर्ज दिला होता. पण यावर पोलिसांनी काहीच कार्यवाही केली नसल्यानेच बालविवाह झाला असेही चाईल्ड लाईन टीमने पोलिसांच्या निदर्शनास आणले. बऱ्याच वादावादीनंतर रात्री ११.३० च्या सुमारास नेवासे पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीता गडाख यांच्या कानी ही सर्व हकीकत चाईल्ड लाईन टीमने घातली. त्यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर ही फिर्याद घेण्यात आली. ही फिर्याद दाखल करण्यास मध्यरात्रीचे १.४५ वाजले. एव्हढ्या उशिरापर्यंत बालिकावधु, मुलीची आई आणि मावशी यांना घेऊन चाईल्ड लाईन टीम उपाशीपोटी कायद्यानुसार कारवाई न करणाऱ्या पोलीस यंत्रणेशी लढा देत होती. त्यामुळे सोनई पोलिसांच्या असंवेदनशीलतेबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कळवण्यात आले. सोनई पोलिसांच्या या कटू अनुभवामुळे यापुढे बालविवाह रोखण्याचा मनस्ताप करावा काय, हा यक्षप्रश्न चाईल्ड लाईन टीम समोर पडल्याचे समन्वयक महेश सूर्यवंशी यांनी नमूद केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post