'ते' प्रस्ताव पडताळणीला मला वेळच नव्हता हो.. मनपा आयुक्तांची कबुली


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
सुमारे पावणे दोन वर्षांपूर्वी सार्वत्रिक निवडणुकीपासून प्रतीक्षेत असलेली महापालिकेच्या ५ स्वीकृत नगरसेवकांची निवड अखेर १९ महिन्यांनी शुक्रवारी (१ ऑक्टोबर) झाली. तब्बल १० गुन्हे दाखल असलेले, पण यापैकी एकही अजून सिद्ध झालेला नसलेले तीनजण, एक वकील व एक उद्योजक यात नगरसेवक म्हणून नियुक्त केले गेले. या पाच प्रस्तावांपैकी चारजणांचे प्रस्ताव जुनेच होते व मागील जानेवारीत तत्कालीन आयुक्त-जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी ते फेटाळले होते. मात्र, यावेळी आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी ते मंजूर केले. या नगरसेवकांनी दाखल केलेल्या प्रस्तावांची पडताळणी करण्यास आपल्याला वेळ मिळाला नाही. मात्र, मागील वेळी ज्या त्रुटी त्यांच्या प्रस्तावात होत्या, त्या त्यांनी दुरुस्त करून व त्यांची पूर्तता करून दिल्या आहेत. दिलेले प्रस्ताव व त्यातील कागदपत्रे खरी असल्याचे प्रतिज्ञापत्रही त्यांच्याकडून घेण्यात आले आहे, असेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले. 

नव्याने स्वीकृत नगरसेवक झालेले शिवसेनेच्या कोट्यातील संग्राम शेळके यांनी साई सेवा संघ या सामाजिक संस्थेचे प्रतिनिधीत्व दाखवले असून, त्यांच्याविरुद्ध २ तर मदन आढाव यांनी नवनाथ देवस्थान सेवा मंडळ ट्रस्ट या संस्थेचे सदस्यत्व दाखवले असून, त्यांच्याविरुद्ध ५ गुन्हे दाखल आहेत. राष्ट्रवादीच्या कोट्यातून नगरसेवक झालेले विपुल शेटिया यांनी विचारधन चेस अकादमी अँड स्पोर्टस क्लब (नागापूर, नगर) या संस्थेचे प्रतिनिधीत्व दाखवले असून त्यांच्याविरुद्ध ३ गुन्हे दाखल आहेत. या तिघांचे मिळून १० गुन्हे आहेत. तसेच राष्ट्रवादीच्या कोट्यातून नगरसेवक झालेले अॅड. राजू कातोरे हे वकील या गटातून नगरसेवक झाले आहेत तर उद्योजक रामदास आंधळे यांनी भाजपच्या कोट्यातून नगरसेवक होताना केडगावच्या सायली सार्वजनिक वाचनालय या सामाजिक संस्थेचे प्रतिनिधीत्व नमूद केले आहे. या पाचही नव्या स्वीकृत नगरसेवकांचा नंतर महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सत्कार केला.

स्वीकृत नगरसेवक नियुक्तीचा घाट मागील जानेवारीत घालण्यात आला होता. मात्र, त्यावेळी आयुक्त-जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पाचही प्रस्ताव फेटाळले होते. या प्रस्तावांतील चार प्रस्ताव यावेळी पुन्हा सादर करण्यात आले. राष्ट्रवादीचे बाबासाहेब गाडळकर यांचे निधन झाल्याने त्यांच्या जागी अॅड. कातोरे यांचा प्रस्ताव देण्यात आला होता. शिवसेनेच्या नावांचे प्रस्ताव गट नेत्या रोहिणी शेंडगे यांनी दिले, राष्ट्रवादीच्या नावांचे प्रस्ताव विरोधी पक्ष नेते व गटनेते संपत बारस्कर यांनी तर भाजपच्या एका नावाचा प्रस्ताव उपमहापौर व गटनेत्या मालनताई ढोणे यांनी दिला होता. आयुक्त मायकलवार यांच्याकडे प्रस्ताव आल्यावर त्यांनी तपासणी करून त्यांची शिफारस महापौर वाकळे यांच्याकडे केली व त्यांनी महापालिकेच्या ऑनलाइन महासभेत ही नव्या नगरसेवकांची नावे जाहीर केली.

या नावांबाबत माहिती देताना आयुक्त मायकलवार यांनी सांगितले की, पाच प्रस्तावांपैकी तीनजणांविरुद्ध पोलिसात गुन्हे दाखल आहेत, पण दोष सिद्धी झाली नसल्याने त्यांची शिफारस करण्यात आली आहे. तसेच मागील वेळी सामाजिक संस्था गटातील ज्यांचे प्रस्ताव फेटाळले गेले होते, त्यांनी त्या मुद्यांच्या त्रुटींची पूर्तता केली आहे. संबंधित संस्थांच्या घटना तसेच चेंज रिपोर्ट व अन्य अनुषंगिक मुद्यांची पूर्तता केली आहे. तसे प्रतिज्ञापत्र (सेल्फ डिक्लेरेशन) त्यांच्याकडून घेतले गेले आहे. त्यांची दाखल केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्याइतका वेळ नव्हता. मात्र, त्यांचे सेल्फ डिक्लेरेशन घेतले असल्याने त्यांच्या प्रस्तावात काही चुकीचे असल्यास ते कायद्यानुसार शिक्षेस पात्र असतील, असेही मायकलवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पाचही स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीचा आनंद महापालिकेसमोर फटाके उडवून साजरा केला गेला.

Post a Comment

Previous Post Next Post