'त्या' नियुक्त्यांचा अहवाल द्या; मनपा आयुक्तांना आदेश, नगरचे स्वीकृत गाजणार

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

महापालिकेने सुमारे महिनाभरापूर्वी नियुक्त केलेल्या पाच नगरसेवकांच्या नियुक्त्यांना आक्षेप घेतला गेल्याने या नियुक्त्या महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार झाल्या की नाही, याची तपासणी करून आपल्या सुस्पष्ट अभिप्रायासह वस्तुनिष्ठ अहवाल तातडीने शासनास सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांना देण्यात आले आहेत. मंत्रालयातील कक्ष अधिकारी सु. द. धोंडे यांच्या या आदेशाचे पत्र महापालिकेत धडकल्यावर मनपा वर्तुळात खळबळ उडाली आहे. नगरच्या पाच स्वीकृत नगरसेवक नियुक्त्या होत असताना आधी गाजल्या होत्याच, आता या नियुक्त्यांना येथील सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी आक्षेप घेतला गेल्याने पुन्हा आणखी गाजण्याची चिन्हे आहेत.

तीन आठवड्यापूर्वी मनपाने नियुक्त केलेल्या पाच स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी बेकायदेशीर असल्याचा दावा शेख यांचा आहे. त्यांनी यासंदर्भात नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांकडे तक्रार केली आहे. या पाचही नियुक्त्या रद्द कराव्यात तसेच त्या करताना कायद्याचे उल्लंघन झाल्याने महापौरांना अपात्र ठरवावे व मनपा आयुक्तांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. त्यांच्या या तक्रारीची दखल मंत्रालयाद्वारे घेतली गेली आहे. कक्ष अधिकारी धोंडे यांनी मनपा आयुक्तांच्या नावे आदेश जारी करून, पाच स्वीकृत नगरसेवकांच्या झालेल्या नियुक्त्या महाराष्ट्र मनपा अधिनियमातील तरतुदीनुसार झाल्या की नाही, याची तपासणी करण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता या पाच नियुक्त्यांची शिफारस स्वतः आयुक्त मायकलवार यांनी केल्यावर महापौर बाबासाहेब वाकळे यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या असल्याने आपणच शिफारस केलेल्या नियुक्त्यांच्या प्रस्तावांबाबत पुन्हा तपासणी करण्याची वेळ आयुक्त मायकलवार यांच्यावर आली आहे.

या नियुक्त्यांची शिफारस करताना संबंधितांचे प्रस्ताव तपासणीस वेळ मिळाला नसल्याचे स्पष्टीकरण आयुक्त मायकलवार यांनी दिले होते, मात्र, संबंधितांचे प्रतिज्ञापत्र घेतले असून, प्रस्तावात दिलेल्या माहितीला ते जबाबदार असल्याचे याद्वारे लिहून घेतले गेले असल्याचा त्यांचा दावा आहे. अशा स्थितीत आता राज्य सरकारने या नियुक्तांच्या प्रस्तावांची तपासणी करण्याचे आदेश दिले असल्याने या पाचही नियुक्त्या वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत. आता तपासणी करताना संबंधितांनी ज्या सामाजिक व सांस्कृतिक संस्थांचे प्रतिनिधी म्हणून नोंद केली आहे, त्या संस्थांच्या दप्तराची तसेच त्या संस्थांच्या दैनंदिन कामकाजातील संबंधितांच्या सहभागाची खातरजमा करून शासनाला अहवाल द्यावा लागणार आहे. मात्र, नगरचे राजकारण पाहता आयुक्त आपणच प्रस्तावित केलेल्या नियुक्त्यांची पुन्हा काटेकोर तपासणी करतात की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, स्वीकृत नगरसेवक निवडीसाठीच्या नियमात वैद्यकीय व्यावसायिक, वकील, प्राध्यापक-शिक्षक, सनदी लेखापाल, इंजिनिअर, निवृत्त मनपा आयुक्त वा सहायक आयुक्त, सामाजिक कार्यकर्ता आदी क्षेत्रातील प्रत्येकी एका तज्ज्ञ व्यक्तीची नियुक्ती या पदावर करणे गरजेचे आहे, असे शेख यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर मागील १ ऑक्टोबरला मनपाच्या महासभेत राष्ट्रवादीकडून विपुल शेटिया व अॅड. राजू कातोरे, शिवसेनेकडून संग्राम शेळके व मदन आढाव आणि भाजपकडून रामदास आंधळे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे आता या नियुक्त्यांबाबत आयुक्तांच्या अहवालाची उत्सुकता व्यक्त होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post