कोविड रुग्णांची लुटालूट करणाऱ्या 10 हॉस्पिटला दणका; जादा घेतलेले २९ लाख तातडीने रुग्णांना परत देण्याचे आदेश

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

कोरोना लागण झाल्यानंतर खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना अव्वाच्या सव्वा बिले आकारून त्यांची लुटालूट करणाऱ्या रुग्णालयांना चाप लावण्याचे काम नगरच्या महापालिकेने सुरू केले आहे. शहरातील साईदीप, स्वास्थ्य, फाटके पाटील, सिटी केअर, लाईफलाईन सुपर स्पेशालिटी अशा बड्या मानल्या जाणाऱ्या हॉस्पिटलसह शहरातील एकूण 10 हॉस्पिटल्सने रुग्णांकडून जादा आकारलेले २९ लाख १२ हजार ३९० रुपये संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांच्या बँक खात्यात सात दिवसात जमा करण्याचे आदेश महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी दिले आहेत. या आदेशाने शहराच्या वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ व जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी या विषयाचा पाठपुरावा केला होता. त्यामुळे महापालिकेला खासगी रुग्णालयांवर कारवाई करणे भाग पडले आहे. आता या रुग्णालयांना रुग्णांच्या नातेवाईकांच्या खात्यात पैसे जमा करण्याची सात दिवसांची मुदत दिली गेली असून, या कालावधीत हे पैसे जमा झाले नाही तर या रुग्णालयांवर साथरोग अधिनियम १८९७ अन्वये कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, रुग्णांकडून जादा आकारलेले पैसे त्यांना परत मिळेपर्यंत आमचा पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे मनसेचे डफळ व भुतारे यांनी सांगितले.

मागील मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादूर्भाव जगभरात आहे. नगरमध्येही तब्बल ५० हजारावर रुग्णांना करोनाची बाधा झाली आहे. अर्थात नियमित उपचाराने यातील सुमारे ९५ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. कोरोनावर उपचारांसाठी सिव्हील व बुथ हॉस्पिटलमध्ये रुग्णांची व्यवस्था करण्यात आली होती, पण त्या काळात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने खासगी रुग्णालयांनाही अशा उपचारांची परवानगी देण्यात आली. पण असे उपचार करताना खासगी रुग्णालयांनी रुग्णांची आर्थिक लूट केली, लाखो रुपयांची बिले त्यांच्याकडून वसूल केली जात असल्याची ओरड सुरू झाल्याने जिल्हा प्रशासनाने अवाजवी वैद्यकीय उपचार शुल्क आकारणी केलेल्या तक्रारींची तपासणी सुरू केली. रुग्णांच्या बिलांची तपासणी करण्यासाठी उपजिल्हाधिकारीस्तरीय भरारी पथक समिती स्थापन करून वैद्यकीय बिलांची तपासणी करण्यात आली व त्यात आढळलेल्या त्रुटीनुसार संबंधित रुग्णालयांकडून जादा आकारण्यात आलेले पैसे वसूल करून संबंधित रुग्णांना देण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाने नगर शहरापुरती महापालिकेच्या आरोग्य विभागावर दिली आहे. या जबाबदारीनुसार मनपाचे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्या आदेशानुसार वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी शहरातील ११ रुग्णालयांना आदेश दिले आहेत व सात दिवसात जादा आकारलेली रक्कम संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांच्या बँक खात्यावर जमा करून त्याचे बँक स्टेटमेंट मनपाच्या आरोग्य विभागाकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. अशी कृती झाली नाही तर साथरोग अधिनियमानुसार संबंधित रुग्णालयांविरुद्ध कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला आहे.

बड्या हॉस्पिटल्सचा समावेश
मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी रुग्णांना त्यांचे जादा घेतलेले पैसे परत करण्याचे आदेश दिलेल्या हॉस्पिटल्समध्ये शहरातील बडी हॉस्पिटल्स आहेत. फाटके पाटील हॉस्पिटल (स्टेशन रोड), अॅपेक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (सावेडी, नगर-मनमाड रोड), साईदीप हॉस्पिटल (यशवंत कॉलनी), लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल (तारकपूर), सिटीकेअर हॉस्पिटल (तारकपूर), सुरभी हॉस्पिटल (औरंगाबाद रोड), प्रणव हॉस्पिटल (अंबिकानगर, केडगाव), विघ्नहर्ता हॉस्पिटल (सक्कर चौक), स्वास्थ्य हॉस्पिटल (लालटाकी) तसेच पटियाला हाऊस कोविड केअर सेंटर (नगर-मनमाड रोड, सावेडी) यांचा यात समावेश आहे. या सर्वांनी मिळून २९ लाख १२ हजार ३९० रुपये सात दिवसात संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोना रुग्णांवरील वैद्यकीय उपचारांसाठी निश्चित केलेल्या दर मर्यादेपेक्षा जादा दर लावले, त्रुटीयुक्त देयके आहेत, अशी कारणे या वसुलीच्या आदेशात देण्यात आली आहेत.

दरम्यान, कोणत्या रुग्णालयाने किती रुग्णांची किती रक्कम परत करायची, याचा मुख्य आदेशात उल्लेख नाही. मात्र, रुग्णालयांना पैसे जमा करण्याबाबत दिलेल्या आदेशासमवेत संबंधित रुग्णांची नावे असलेली यादी व त्यांना परत द्यावयाची रक्कम यांचा उल्लेख असल्याचे सांगितले जाते. मनसेचे डफळ व भुतारे यांनीही त्याला दुजोरा दिला. या दोघांशिवाय जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस उबेद शेख यांनीही खासगी रुग्णालयांकडून जादा आकारणी झालेले पैसे संबंधित रुग्णांना परत करण्याबाबत पाठपुरावा केला होता. त्यामुळे मनपाच्या आरोग्य विभागानेही त्यांना तसेच मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पत्र देऊन शहरातील १0 रुग्णालयांना जादा आकारलेले २९ लाख रुपये रुग्णांना परत करण्याचे आदेश दिल्याची प्रत दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post