शास्‍तीमाफीचा निर्णय आज सायंकाळपर्यंत; राष्ट्रवादीच्या आंदोलकांना आयुक्तांचे आश्वासन

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील मालमत्‍ता धारकांची थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे. तसेच यावर्षी कोरोना सं‍सर्ग विषाणूच्‍या महामारीमुळे अनेक कंपन्‍या बंद पडल्‍या असल्‍यामुळे कामगारांचे काम गेले आहे. तसेच शहर व उपनगरातील विविध भागामध्‍ये दारिद्र रेषेखाली गोरगरिब नागरिक, मोलमजूरी, रोजंदारी कामगार, एमआयडीसी मध्‍ये काम करणारे कामगार मोठ्या प्रमाणात राहत आहे. कोरोनामुळे त्‍यांच्‍या कामावर अनियमित्‍ता आल्‍यामुळे त्‍यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्‍यामुळे मनपाचा मालमत्‍ता कर भरु शकत नसल्‍यामुळे राष्‍ट्रवादी कॉंग्रेसच्‍या वतीने आयुक्तांकडे मागणी करून आंदोलन करण्यात आले. यावेळी उद्या (बुधवार) सायंकाळ पर्यंत शास्तीमाफी संदर्भात निर्णय घेण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल्याची माहिती विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर यांनी दिली.

आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांच्‍याकडे शास्तीमाफीबाबत शहर जिल्‍हा राष्‍ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्‍या वतीने मागणी करण्‍यात येऊन आंदोलन करण्यात आले. यावेळी विरोधी पक्ष नेते बारस्‍कर, नगरसेवक गणेश भोसले, राष्‍ट्रवादी कॉग्रेसचे शहर जिल्‍हाध्‍यक्ष प्रा.माणिक विधाते, महिला अध्‍यक्ष रेश्‍मा आठरे, नगरसेवक अविनाश घुले, विनीत पाऊलबुधे, प्रकाश भागानगरे, डॉ. सागर बोरूडे, बाळासाहेब पवार, निखील वारे, सुनिल त्रिंबके, समद खान, विपुल शेटीया, भा कुरेशी, राजेश कातोरे, अंजली गायकवाड, साधना बोरूडे, रंजना उर्किडे, सुनंदा कांबळे, भरत गारूडकर आदी उपस्थित होते.

मालमत्‍ता धारकांकडे घरपट्टी व पाणीपट्टीची थकबाकी असून त्‍यामध्‍ये अवाजवी प्रमाणात शास्‍तीची रक्‍कम आकारण्‍यात आलेली आहे. शास्‍तीमाफ केल्‍याने मालमत्‍ताधारक मोठ्या प्रमाणात मालमत्‍ता कर भरतील व मालमत्‍ताधारकांनाही दिलासा मिळेल, असा दावा करण्यात आला.

..अधिका-यांच्‍या घरच्‍या लाईट बंद करणार
काही दिवसांवर दिवाळीचा सण आला आहे. गेल्‍या अनेक महिन्‍यांपासून शहरातील पथदिवे बंद असल्‍यामुळे शहरात अंधाराचे साम्राज्‍य पसरलेले आहे. शहरातील पथदिवे लवकरात लवकर सुरू करून शहरातील नागरिकांना दिवाळीला अंधाराच्‍या साम्राज्‍यातून मुक्‍त करुन उजाळा द्यावा. दिवाळीमध्‍ये शहरातील पथदिव्यांचा प्रश्‍न मार्गी न लागल्‍यास अधिका-यांच्‍या घरच्‍या लाईट बंद करण्‍याचा इशारा यावेळी देण्‍यात आला. तसेच शहरामध्‍ये मनपाच्‍या माध्‍यमातून एलईडी पथदिवे बसविण्‍याची योजनेच्‍या कामाची सुरूवात लवकरात लवकर करून ही योजना मार्गी लावून लाईटचा प्रश्‍न कायमस्‍वरुपी मार्गी लावावा, अशी मागणी यावेळी करण्‍यात आली.

आयुक्‍त मायकलवार यांचे आश्वासन
आयुक्त मायकलवार यांनी काल सायंकाळी मनपा अधिकारी यांची शास्‍तीमाफी संदर्भात बैठक घेवून विविध सुचना केल्‍या आहेत. शहराची 102 कोटी रूपयाची शास्‍तीमाफीची रक्‍कम थकीत असून मालमत्‍ताधारकांना किती टक्‍के शास्‍तीमाफी दिल्‍याने फायदा होईल, मालमत्‍ताधारक किती रक्‍कम भरतील, याचा आढावा सुरू असून किती दिवस शास्‍तीमाफी द्यावी याची माहिती घेतली जाईल. तसेच सर्व यंत्रणा कार्यन्‍वीत करून अधिकारी यांचेवर जबाबदारी दिली जाईल. उद्या सायंकाळपर्यत शास्‍तीमाफीचा निर्णय घेतला जाईल. 26 लाख रूपयाच्या लाईटच्‍या साहित्‍याची खरेदी केली असून येत्‍या 5 दिवसात लाईट बसविण्‍याच्‍या कामास सुरूवात केली जाईल, असे आश्‍वासन आयुक्‍त मायकलवार यांनी दिले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post