वस्तू कर्जवाटपात ४५ लाखाचा अपहार? मनपा पतसंस्था वादाच्या भोवऱ्यात

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

महापालिका कर्मचारी पतसंस्थेत वस्तू कर्जवाटपात 45 लाख रुपयांचा अपहार झाल्याचा दावा काही सभासदांनी केला असून, सभासदांची फसवणूक करणार्‍या चेअरमन, व्हा. चेअरमन व संबंधित ज्वेलर्सविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली गेली आहे.

पतसंस्थेचे सभासद विजय चव्हाण, संजू उमाप, सोमनाथ गायकवाड, मच्छिंद्र साबळे, साहेबराव बोरगे, संजय बोरगे, विजय घोरपडे, ज्ञानेश्वर मगर, देवीदास जाधव, वसंत कांबळे, शाम घोरपडे, विजय ठोकळ यांनी पोलिस अधीक्षक व जिल्हा उपनिबंधक यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे. यात म्हटले आहे की, मनपा कर्मचारी पतसंस्थेत सभासदांना वस्तू कर्जवाटप सुरू झाल्याने कर्मचार्‍यांनी वस्तू कर्जासाठी मागणी केली होती. पतसंस्थेत सरसकट सर्व वस्तू कर्ज संबंधित ज्वेलर्स यांच्याकडे घेण्याची सक्ती केली. मंजूर कर्ज रु. 90,000 रकमेपैकी 13,000 कापून घेऊन सभासदास रु. 77,000 रोख दिले गेले. वस्तू घेण्यासाठी दुसर्‍या दुकानाचे कोटेशन घेऊन येतो म्हणालो तर कर्ज मिळणार नाही असे सुनावले गेले तसेच मंजूर रकमेतील 13,000 रुपये कशाचे वजा करता, अशी विचारणा केली तर उडवाउडवीची उत्तरे देऊन कर्ज देण्यास नकार दिला जातो.

सोन्याच्या वस्तूवर जीएसटी कर हा 3% असून, 90,000 वर 3% प्रमाणे 2700 रु. टॅक्स लागत आहे. तसे न करता 13,000 रु. हे संस्थेचे चेअरमन आणि व्यवस्थापक व व्हाईस चेअरमन यांनी संगनमताने सभासदांची आर्थिक लूट केली. यावरून संस्थेचे चेअरमन व व्हा. चेअरमन व ज्वेलर्सचे मालक यांनी आमची फसवणूक करून सुमारे 35 ते 45 लाख रुपये रकमेचा अपहार केला आहे. तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून मागासवर्गीय चतुर्थ श्रेणीतील लोकांना न्याय द्यावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post