एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
राज्यातील महाविकास आघाडी सरकार नगर जिल्ह्याला १५ वा आमदार देण्याची शक्यता आहे. तशी जोरदार चर्चा राज्याच्या राजकीय स्तरावर आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये नगर जिल्ह्यातून संगमनेरचे युवा नेते व प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांचे नाव काँग्रेसच्या कोट्यातून तर प्रदेश राष्ट्रवादीचे पदाधिकारी व मूळचे पाथर्डी येथील असलेले शिवाजीराव गर्जे यांचे नाव राष्ट्रवादीच्या कोट्यातून चर्चेत आहे. नगर जिल्हावासियांचा विचार केला तर ही दोन्ही नावे दोन वेगवेगळ्या पक्षांच्या कोट्यातून आली असल्याने दोन्हींना पसंती असणार आहे. पण महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते नगर जिल्ह्याला एकाचवेळी दोन आमदारकी देतील का हा प्रश्नच आहे. त्यामुळे सध्या तरी जिल्हावासियांना किमान आणखी एका आमदाराची नियुक्ती अपेक्षित आहे. त्यामुळे तांबे की गर्जे यापैकी कोण, याची प्रतीक्षा आहे. दरम्यान, राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी अंतिम करून त्या नावांची शिफारस राज्यपालांकडे करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट मिटींगची प्रतीक्षा आहे.
नगर जिल्ह्यात सध्या १४ आमदार आहेत. जिल्ह्यात विधानसभा मतदार संघ १२ आहेत व त्यात राष्ट्रवादीचे सर्वाधिक ६ आमदार असून, त्यांच्यात संग्राम जगताप (नगर शहर), निलेश लंके (पारनेर), डॉ. किरण लहामटे (अकोले), आशुतोष काळे (कोपरगाव), रोहित पवार (कर्जत-जामखेड) व नगर विकास राज्यमंत्री असलेले प्राजक्त तनपुरे (राहुरी) यांचा समावेश आहे. काँग्रेसचे २ आमदार असून, त्यांच्यात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (संगमनेर) व लहू कानडे (श्रीरामपूर) यांचा समावेश आहे. भाजपचे ३ आमदार असून, राधाकृष्ण विखे (शिर्डी), बबनराव पाचपुते (श्रीगोंदे) व मोनिका राजळे (शेवगाव-पाथर्डी) यांचा यात समावेश आहे. नेवासे मतदार संघाचे आमदार क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे (अपक्ष) शंकरराव गडाख आहेत. तर विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाची आमदारकी संगमनेरचे डॉ. सुधीर तांबे यांच्या माध्यमातून नगर जिल्ह्यात आहे तसेच स्थानिक स्वराज्य मतदार संघाची विधान परिषदेची आमदारकी नगरचे अरुण जगताप यांच्याकडे आहे. असे १४ आमदार जिल्ह्याला असताना आता पंधरावा आमदार कधी येतो, याची उत्सुकता व्यक्त होत आहे.
सत्यजित तांबे यांना राज्यपाल नियुक्त आमदारकी द्यावी किंवा या नियुक्त्यांमध्ये त्यांचा समावेश आहे, अशा आशयाचे वृत्त मध्यंतरी सोशल मिडियातून चर्चेत होते. पण मागच्या कॅबिनेट मिटिंगमध्ये या विषयावर चर्चाच झाली नाही व आताची अशी मिटींग ऐनवेळी रद्द झाल्याचे सांगितले जात असल्याने चर्चेतील नावे तशीच चर्चेत राहून नंतर विरून गेली. पण आता पुन्हा ही नावे चर्चेत येत असताना जिल्ह्यातून आता तांबेंसह शिवाजीराव गर्जे यांची नावे समोर आल्याने राजकीय वर्तुळातून पुन्हा चर्चेला उधाण आले आहे. अर्थात ही चर्चा होत असताना दुसरीकडे तांबेंचे वडील आमदार आहेत, आई दुर्गाताई तांबे संगमनेरच्या नगराध्यक्ष आहेत व मामा बाळासाहेब थोरात राज्याचे ज्येष्ठ मंत्री आहेत, त्यामुळे सत्यजित यांची वर्णी लागेल की नाही याबाबतही संभ्रम व्यक्त होत आहे.
राज्यपाल नियुक्त आमदारांच्या १२ जागांपैकी महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस या तिन्ही पक्षांनी प्रत्येकी चार जागा वाटून घेतल्या आहेत. नुकतेच राष्ट्रवादीत प्रवेश केलेले नाथाभाऊ खडसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, गायक आनंद शिंदे, सचिन सावंत, मोहन जोशी, नसीम खान, मिलिंद नार्वेकर, सचिन आहिर, नितीन बानगुडे, अर्जुन खोतकर अशी बडी नावे या आमदारकीसाठी चर्चेत असताना नगर जिल्ह्यात चर्चेत असलेल्या दोन नावांचा कितपत विचार होईल, असाही सवाल उपस्थित होत आहे. पूर्वी जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष राजेंद्र फाळके यांचे नाव राष्ट्रवादीकडून व पारनेरचे सेनेचे माजी आमदार विजय औटी यांचे नाव शिवसेनेकडून चर्चेत होते. पण आता ही दोन नावे मागे पडून नव्याने तांबे व गर्जे ही नावे चर्चेत आली आहेत. त्यातही राज्यपाल नियुक्त आमदार नियुक्ती मनपा-नगरपालिकांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्तरावरील स्वीकृत सदस्य नियुक्तीप्रमाणे केली जाते. विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा राज्याच्या विकासाचे धोरण ठरवताना उपयोग व्हावा म्हणून अशा तज्ज्ञांना या नियुक्तीत स्थान दिले जाते. पण बऱ्याचदा या नियुक्त्या राजकीय नेत्यांच्याच होतात. अशा स्थितीत आता राज्यातील महाविकास आघाडी सरकार राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी अंतिम कधी करणार व त्यात नगरच्या दोन नावांपैकी कोणते नाव...की दोन्ही नावे असतात तसेच राज्य सरकार व राज्यपालांतील सुप्त संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या यादीला मंजुरी मिळते की नाही, याची उत्सुकता जिल्ह्यातून व्यक्त होत आहे.
नगरमधून राठोडांची शिफारस
नगरचे शिवसेनेचे माजी आमदार दिवंगत अनिलभय्या राठोड यांचे चिरंजीव माजी नगरसेवक विक्रम राठोड यांना राज्यपाल नियुक्त आमदारकीची संधी शिवसेनेने देण्याची मागणी जिल्हा शिवसेनेने केली आहे. तसे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आले आहे. दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांच्यासह नगरसेवक अमोल येवले, सचिन शिंदे, सुनीता कोतकर, विद्या खैरे व सुवर्णा गेनप्पा यांनी अशी विक्रम राठोड यांच्या नावाची शिफारस व मागणी करणारी पत्रे मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठवली आहेत. दिवंगत माजी आमदार अनिलभय्या राठोड यांनी २५ वर्षे आमदारकीच्या माध्यमातून तसेच संघटनेच्या माध्यमातून जिल्हा शिवसेनेची तब्बल ४० वर्षांची सेवा केली असल्याने त्याची दखल घेऊन त्यांचे चिरंजीव विक्रम राठोड यांना विधान परिषदेवर आमदारकीची संधी मिळावी,अशी अपेक्षा या पत्रांतून व्यक्त केली गेली आहे.
Post a Comment