कौटुंबिक न्यायालयाने जाणली 'तिची' वेदना आणि पालकांना दिली समज


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज 
पतीने घराबाहेर काढल्यावर त्याच्याविरुद्ध न्यायालयीन लढा देत असताना दुसरीकडे जन्मदात्या आई-वडिलांनीही आसरा देण्यास नकार दिल्याने आधारहीन झालेल्या विवाहितेच्या वेदना पाहून कुटुंब न्यायालयाने तिची स्वयंसेवी संस्थेत रवानगी केली व दुसरीकडे तिच्या आई-वडिलांनाही बोलावून त्यांच्या सामाजिक कर्तव्याची जाणीव त्यांना दिली. अखेर पुन्हा ती विवाहिता आई-वडिलांच्या घरी आनंदाने परतली. अहदगरच्या न्यायालयात घडलेल्या या घटनेचे कौतुक होत आहे.

याबाबतची माहिती अशी की, एक महिला पक्षकार ३ ऑक्टोबरला तारीख संपल्यानंतर ती न्यायालयातून बाहेर गेली व पुन्हा परत येऊन सांयकाळपासून रात्री सुमारे ९ वाजेपर्यंत न्यायालयाच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळ बसून राहिली. या महिलेचा घटस्फोटासाठी अहमदनगर कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल आहे. परंतु लॉकडाऊनमुळे प्रकरणे प्रलंबित असून त्या महिलेला पतीने घराबाहेर हाकलून दिले आहे. ती महिला तारखेला न्यायालयात आली होती. ती आई-वडिलांकडे राहते, पण त्यांनीही तिला निवारा न देता घरी न येण्याचे सांगितले, असे समजले. सासर-माहेर अशी दोन्हीकडची दारे बंद झाल्यामुळे ती महिला कौटुंबिक न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सायंकाळपासून रात्री उशीरापर्यंत विवंचनेत रडत बसली होती. त्या दरम्यान जिल्हा न्यायालयाचे पहारेकरी-शिपाई यांनी कौटुंबिक न्यायालयाच्या विवाह समुपदेशक सुषमा बिडवे यांना मोबाईलद्वारे याबाबत सांगितले. त्यानंतर श्रीमती बिडवे यांनी या महिलेची विचारपूस केली व त्यानंतर न्यायाधीश नेत्रा कंक यांना याबाबत कळवून व मार्गदर्शन घेऊन सामाजिक संस्था असलेल्या स्नेहालय संस्थेशी संपर्क साधून त्या महिलेस तात्पुरता निवारा देण्याची विनंती केली व त्यानंतर स्नेहालय संस्थेने महिला कर्मचाऱ्यांमार्फत त्या महिलेस घेऊन जाऊन निवारा दिला. 

त्यानंतर न्यायाधीश नेत्रा कंक व विवाह समुपदेश सुषमा बिडवे यांनी त्या महिलेच्या आई-वडिलांना बोलावून घेऊन सामाजिक जाणीव करून दिली व त्यानंतर स्नेहालयातून त्या महिलेस तिचे आई-वडिल आनंदाने घरी घेऊन गेले. या महिलेच्या पालकत्वबाबत दखल घेत महाराष्ट्र कौटुंबिक न्यायालय अधिनियम १९८७, नियम २२ अंतर्गत सामाजिक संस्थेच्या छताखाली तात्पुरत्या निवाऱ्याची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत न्यायाधिशांकडून विवाह समुपदेशकांना सांगण्याच्या घटनेतून न्यायपालिकेचा संवेदनशीलपणा समोर आला आहे व त्याचे कौतुकही होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post