नगरच्या गिरीजाचा आंतरराष्ट्रीय डंका; 'भारतीय तलवारी'वर युक्रेनमध्ये शोधनिबंध

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

बडोदा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठात पुरातत्व शास्त्र विषयात पदवी शिक्षण घेत असलेल्या व आता याच विषयात पदव्युत्तर शिक्षण घेण्याच्या तयारीत असलेल्या नगरच्या गिरीजा दुधाट या युवतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या अभ्यासाची व संशोधनाची व्याप्ती वाढवली आहे. पुरातत्व शास्त्र विषयाच्या अभ्यासादरम्यान तिने भारतीय शस्त्रे विषयांचाही अभ्यास केला असून, याच विषयातील आंतरराष्ट्रीय शोध निबंध ती युक्रेन देशाची राजधानी असलेल्या किव्ह येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर करणार आहे. ''भारतीय तलवारी'' या विषयावर तिने ४० पानी शोध निबंध लिहिला असून, मध्ययुगीन तसेच मोगल-ब्रिटीशकालीन तलवारी व त्यांची वैशिष्ट्ये ती यात मांडणार आहे. मागील सुमारे २५-३० वर्षांच्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय शस्त्रांवर पहिल्यांदाच असा शोध निबंध सादर होत असून, त्यासाठी अभ्यास व धाडस करणाऱ्या नगरच्या गिरीजा दुधाट या युवतीचे कौतुक होत आहे.

युक्रेन येथे येत्या ३ ते ६ नोव्हेंबरदरम्यान ''हिस्ट्री ऑफ आर्म्स अँड आर्मर'' या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. यात भारतीय तलवारी या विषयावर गिरीजा शोधनिबंध सादर करणार आहे. मोगलकालीन वक्र तलवारींची रचना, स्वरुप व तत्कालीन महत्त्व असे या शोधनिबंधाचे स्वरुप आहे. युक्रेनची आंतरराष्ट्रीय परिषद यंदा चौथ्या वर्षी होत असून, ती सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच भारतीय शस्त्रे विषयावर येथे शोधनिबंध सादर होत आहे. १९६० ते ९० या काळात भारतीय शस्त्रे या विषयावर जी. एन. पंत, स्वामी देवव्रत सरस्वती, पंडित महेंद्रकुमार, पंडित हरदयालू स्वामी, पूर्णिमा रॉय, शीला झुनझुनवाला आदींनी भारतीय शस्त्रे विषयावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन केले आहे. त्यांचा हा वारसा जपण्याचे प्रयत्न नगरच्या गिरीजा दुधाट या युवतीकडून सुरू आहे. युक्रेनमधील परिषदेत शोधनिबंध सादर करण्याची संधी मिळाल्याने यानिमित्ताने भारतात शस्त्र परिषद सुरू करण्यासह भारतीय शस्त्रे या विषयाची नव्या पिढीत जागृती व्हावी व त्यांच्याकडूनही या विषयात संशोधन होण्यासाठी महाराष्ट्र व देशातील ऐतिहासिक संग्रहालयांमध्ये शस्त्र अभ्यासकांची व्याख्याने व कार्यशाळा घेण्याचा मानस तिने व्यक्त केला आहे. पुरातत्व शास्त्र विषयाच्या अभ्यासासमवेत भारतीय शस्त्रे विषयाचा अभ्यास करण्यासाठी तिला बडोदा विद्यापीठातील प्रा. डॉ. उर्मी घोष-बिस्वास, सालारजंग म्युझियमचे माजी अभिरक्षक अहमद अली, ज्येष्ठ शस्त्र अभ्यासक व संग्राहक गिरीश जाधव, महाराष्ट्र पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, नगरचे लोकसाहित्य अभ्यासक डॉ. प्रभाकर मांडे, ज्येष्ठ लेखक निरंजन घाटे यांचे मार्गदर्शन मिळाले. इतिहास अभ्यासात शस्त्र अभ्यास हा स्वतंत्र विषय नसला तरी विदेशात शस्त्र विषयाचे नियमित संशोधन सुरू असते व जागतिक स्तरावर भारतीय शस्त्रांबाबत औत्सुक्य आहे. गिरीजाने भारतीय शस्त्रांवर ''शस्त्रवेध'' हे पुस्तकही लिहिलेले आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करणारी नगरची ही युवती कौतुक मिळवून जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post