डॉक्टरांच्या तक्रारीची दखल व ऑक्सिजन पुरवठादारास जारी नोटीस

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

वैद्यकीय क्षेत्राला होणारा ऑक्सिजन पुरवठा काळ्या बाजाराने होत असल्याच्या इंडियन मेडिकल असोसिएशनने केलेल्या तक्रारीची दखल अन्न व औषध प्रशासनाने घेतली असून, एका ऑक्सिजन पुरवठादार संस्थेस नोटिस बजावून खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत व तोपर्यंत पुरवठा बंद करण्याचेही सांगितले आहे तर अन्य पुरवठादार संस्थांना केंद्र सरकारने निर्धारित केलेल्या दरानुसारच ऑक्सिजन पुरवठा केला नाही तर कारवाईची तंबी दिली आहे.


१८० रुपयांना मिळणारे ७ टन वजनाचे ऑक्सिजन सिलेंडर काळ्या बाजारात ७०० ते १००० रुपयांना घ्यावे लागत असल्याने रुग्णांना त्याची झळ पोहोचते, पण वैद्यकीय क्षेत्र यामुळे बदनाम होत असल्याची तक्रार वैद्यकीय संघटनेने जिल्हा प्रशासनाकडे केली होती. या तक्रारीची माहिती नगरच्या पत्रकारांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या निदर्शनास आणली होती. त्यांनी याबाबत तातडीने कारवाईचे आदेश जिल्हा प्रशासनास व अन्न-औषध प्रशासनास दिले होते. त्यानुसार मेडीकल ऑक्सीजन पुरवठा करणार्‍या संस्थेस अन्न व औषध प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नगर येथील साई आनंद एजन्सीला अन्न व औषध प्रशासन विभागाने काम बंद करण्याचे आदेश देऊन कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या एजन्सीजसंदर्भात तक्रारी येत असल्याने त्याची दखल आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी घेऊन अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अहमदनगर कार्यालयास कार्यवाहीच्या सूचना दिल्या होत्या, असे सांगण्यात आले. अन्‍न व औषध प्रशासन विभागाच्या नगर कार्यालयामार्फत मेडिकल ऑक्सिजन पुरवठा करणारी संस्था मे. साई आनंद एजन्‍सीची (स्‍वस्तिक चौक, अहमदनगर) चौकशी केली असून त्‍याअनुषंगाने या संस्थेस सहाय्यक आयुक्‍त (औषधे) अशोक राठोड यांनी काम बंद करण्‍याचे आदेश देऊन कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याशिवाय, इतर मेडिकल ऑक्सिजन पुरवठा करणा-या संस्‍थांना मेडिकल ऑक्सिजनची विक्री करताना भारत सरकार रसायन व उर्वरक मंत्रालयाने (नवी दिल्‍ली) 25 सप्‍टेंबर 2020 रोजी प्रसिध्‍द केलेल्‍या पत्रकानुसार दर आकारण्‍याच्या सूचना केल्या आहेत. या आदेशाची अंमलबजावणी न केल्‍यास कठोर कारवाई करण्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

तक्रारींचे आवाहन
मेडिकल ऑक्सिजनच्‍या पुरवठ्याबाबत व त्यासाठी आकारण्‍यात येणाऱ्या किमतीबाबत तक्रार असल्‍यास अन्‍न व औषध प्रशासन, अहमदनगर कार्यालयाच्या दूरध्‍वनी क्र. 0241-2430243/7045757882 यावर संपर्क साधण्याचे आवाहन राठोड यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post