एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
''नाथाभाऊ (खडसे) पक्षाला सोडून गेल्याचे दुःख आहेच. पण याबद्दल मी त्यावेळी बोलले आहे. आता नव्याने यावर मला काहीही बोलायचे नाही'', अशा शब्दात माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी 'तो' विषय झटकून टाकला. दरम्यान, ओल्या दुष्काळाबाबतची नुकसान भरपाई कमीच आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
भाजपच्या नूतन राष्ट्रीय महामंत्री पंकजा मुंडे या गोपीनाथ गड येथील दसरा मेळावा करुन पुण्यात जात असतांना माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी काहीकाळ थांबल्या होत्या. यावेळी गांधी यांच्यासह त्यांचे चिरंजीव माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना, 'नाथाभाऊंबद्दल नवीन काही बोलायचे नाही', असे सांगून त्यांनी त्यावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला.
त्यानंतर त्या म्हणाल्या, ''सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वसामान्य नागरिक अडचणीत सापडला आहे. तसेच शेतकरीही अतिवृष्टीमुळे संकटात सापडले आहेत. राज्य सरकारने जास्तीत जास्त मदत संकटकाळात जनतेला करणे गरजेचे आहे. शेतकर्यांसाठी जाहीर केलेले पॅकेजचे मी स्वागत करते. मात्र, याहून अधिक मोठे पॅकेज देणे अपेक्षित होते. केंद्र सरकारही मोठी मदत सर्व जनतेला या संकटकाळात करीत आहे'', असे त्यांनी सांगितले. यावेळी आशिष अनेचा, यश शर्मा, डॉ.रवींद्र खेडकर, डॉ.ज्ञानेश्वर दराडे उपस्थित होते. ''पक्षाने राष्ट्रीय महामंत्रीसारखे मोठ्या जबाबदारीचे पद देऊन पंकजा मुंडेंच्या कार्याची दखल घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे काम अधिक प्रभावी होईल'', असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांनी यावेळी केले.
Post a Comment