कानिफनाथ देवस्थानात 'त्यांच्या' प्राधान्याला आक्षेप!

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मढी येथील भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीकानिफनाथ देवस्थान ट्रस्टवर विश्वस्त म्हणून मरकड परिवारातील जास्त सदस्यांची निवड बेकायदेशीर ठरवण्याची व लोकशाही पद्धतीने नव्या विश्वस्त मंडळाची नियुक्ती करण्याची मागणी सहायक धर्मादाय आयुक्तांकडे याचिकेद्वारे करण्यात आली आहे. या याचिकेमुळे मढी देवस्थानवर विश्वस्त होऊ इच्छिणारांमध्ये खळबळ उडाली आहे.

देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाचे उपाध्यक्षपद भूषविलेले सुनील सानप आणि नाथभक्त निवृत्ती तेलंग यांनी औरंगाबाद येथील प्रसिध्द वकील अमित सावळे यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत देवस्थानच्या विश्वस्त मंडळाची निवड लोकशाही पध्दतीने आणि कोणत्याही एका कुटूंबाला प्राधान्य न देता व्हावी, अशी मागणी केली आहे. धर्मदाय उपायुक्तांनी श्रीकानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळ निवडीसाठी वृत्तपत्रात जाहिरात देवून मागविलेल्या अर्जांमध्ये श्रीक्षेत्र मढी येथील मरकड कुटूंबामधून सहा आणि भाविकांमधून पाच अशा एकूण अकरा विश्वस्तांची निवड करण्यात येईल, असे नमूद केले आहे. वस्तुतः सहाय्यक धर्मदाय आयुक्तांनीच १९९० सालच्या आदेशामध्ये मरकड कुटूंबातील लोकांना प्राधान्य दिल्यास गैरप्रकार वाढतील म्हणून तसे करू नये, असे स्पष्ट केले होते, असा याचिकाकर्त्यांचा दावा आहे. एकाच कुटुंबातील व्यक्तींना पुन्हा प्राधान्य देणे भारतीय राज्य घटनेस अनुसरून नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. यामुळे श्रीकानिफनाथ देवस्थान ट्रस्ट, श्रीक्षेत्र मढी (ता. पाथर्डी) येथील विश्वस्त मंडळाच्या रचनेसंदर्भातील तरतुदींमध्ये बदल व्हावा म्हणून येथील धर्मदाय उपायुक्त कार्यालयात स्कीम अर्ज दाखल करण्यात आला आहे.

विश्वस्त मंडळाची निवड करण्याची नोटीस नगर शहरातील धर्मदाय उपायुक्त कार्यालयाने प्रसिद्ध करताच विश्वस्त होऊ इच्छिणारांची धांदल उडाली आहे. मात्र, दाखल झालेला स्कीम अर्ज इतिहास घडवणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मरकड कुटूंबियांच्या निवडीस आव्हान देणाऱ्या याचिकेवर काय निर्णय होणार, याकडे केवळ नगर जिल्ह्याचेच नव्हे तर महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे. श्रीकानिफनाथांच्या संजीवन समाधी दर्शनास राज्याच्या विविध भागांमधील भाविकांचा ओघ वर्षभर सुरूच असतो. त्यामुळे याचिका दाखल झाल्याचा विषय सोशल मिडियावरून राज्यभर पोहोचला असून राज्यातील भाविकांमधून विश्वस्तांची निवड व्हावी, अशा मागणीचे सूर उमटू लागले आहेत

Post a Comment

Previous Post Next Post