'त्यांची' झोपण्याची व जेवणाची व्यवस्था करा आणि 'त्यांना' चेस व पत्त्याचा कॅट द्या

 

एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
मालमत्ता खरेदी-विक्रीची दस्त नोंदणी तांत्रिक अडचणीने संथ गतीने सुरू असल्याने ती पूर्ण होईपर्यंत मालमत्तेची विक्री केलेल्याला सांभाळण्याची जबाबदारी खरेदीदारावर आली आहे. विक्री केलेल्याची यासाठी करावी लागणारी मिनतवारी व खर्च परवडेनासा झाला असल्याने शासनानेच या विक्री करणारांच्या निवासाची व जेवणाची व्यवस्था करावी तसेच दस्त नोंदणी प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याने शासकीय कर्मचारी बसून असल्याने त्यांना टाइमपास करण्यासाठी पत्त्याचे कॅट व चेस (बुद्धीबळ पट) द्यावा, अशी उपरोधिक मागणी भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाचे कार्यकर्ते अॅड. श्याम आसावा यांनी केली आहे.


यासंदर्भात अॅड. आसावा यांनी राज्याच्या महसूल विभागाचे सचिव, महाराष्ट्राचे नोंदणी महानिरीक्षक तसेच नगरचे मुद्रांक जिल्हाधिकारी व सह जिल्हा निबंधकांना पत्र पाठवले आहे. नगर जिल्ह्यातील सह दुय्यम निबंधक कार्यालयातील मालमत्ता खरेदी-विक्री दस्त नोंदणी प्रणाली मागील आठवड्यापासून बंद आहे किंवा संथ असल्याने अनेक दस्तांची नोंदणी खोळंबली आहे. शासनाने तातडीने या प्रणालीतील दोष दूर करून ही प्रणाली सुरळीत करावी. जोपर्यंत प्रणाली सुरळीत होत नाही, तोपर्यंत दोस्त नोंदणी करता आलेल्या पक्षकारांच्या निवासाची व जेवणाची व्यवस्था करावी. शासनाने या विनंत्या मान्य केल्या नाही तर आम्हाला दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जेवणाचे डब्बे व झोपण्याचे साहित्य घेऊन मुक्काम ठोकावा लागेल. तसेच याच्या निषेधार्थ प्रतीकात्मक म्हणून सर्व दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पत्याचे कॅट, चेस सारखे करमणुकीचे खेळ साहित्य वाटप करणार आहोत, याची नोंद घेण्याचेही त्यांनी यात नमूद केले आहे.

सर्वांचे हाल सुरू
यासंदर्भात अॅड. आसावा यांनी सांगितले की, दस्त नोंदणी करण्यापूर्वी सदर दस्तावर पक्षकारांच्या सह्या घेणे आवश्यक असते. त्याशिवाय दस्त नोंदणीसाठी नंबरला घेतले जात नाही व त्यास टोकन नंबर दिला जात नाही. सह्या करण्यापूर्वी विक्री करणारे मालमत्तेच्या विक्रीसाठी संपूर्ण मोबदला घेतल्याशिवाय दस्तावर सह्या करीत नाहीत. थोडक्यात मालमत्ता खरेदी करणाऱ्यास विक्री करणाऱ्या पक्षकारास मालमत्ता खरेदीचा पूर्ण मोबदला अदा करून पक्षकारांच्या सह्या घ्याव्या लागतात व त्यानंतर दस्त नंबरला लावावा लागतो, असे सांगून ते म्हणाले, मोबदला दिल्यानंतर दस्त नोंदणी जोपर्यंत ऑनलाइन प्रणालीमध्ये नोंदवून पूर्ण होवुन त्या दस्ताच्या इंडेक्सवर सर्व पक्षकारांच्या सह्या होत नाहीत, तोपर्यंत दस्त नोंदणी कायद्यानुसार पूर्ण होत नाही. या पार्श्वभूमीवर संगणक प्रणाली बंद किंवा संथ असल्याने सर्वांचे हाल सुरू आहेत. ज्या पक्षकारांनी मालमत्ता खरेदीचा संपूर्ण मोबदला दिलेला आहे, पण संगणकीय प्रणालीच्या अडचणींमुळे दस्ताची नोंदणी होऊ शकलेली नाही, त्यांचे जीव टांगणीला लागले आहे. ज्या व्यवहारात मोबदल्याची रक्कम फार मोठी आहे, त्यात दस्त नोंदणी पूर्ण न झाल्यास व त्या दरम्यानविक्री करणाऱ्या पक्षकाराचे काही बरे-वाईट झाल्यास अथवा नीतीमत्तेत बदल झाल्यास मोठा आर्थिक फटका बसण्याची भीती सतत असते. मोबदला दिलेला असल्याने दस्तांची नोंदणी पूर्ण होईपावेतो खरेदी घेणाराला विक्री करणाऱ्या पक्षकारांच्या सतत संपर्कात राहावे लागत आहे. किंबहुना विक्री करणारे पक्षकाराला सांभाळावे लागत आहे. त्यांची प्रवासाची, जेवणाची व्यवस्था करावी लागत आहे. यातून खरेदी घेणाऱ्या व देणाऱ्या पक्षकारांच्या स्वतःच्या वेळेचा अपव्यय तर होतच आहे, परंतु आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यापूर्वीसुद्धा वारंवार संगणक प्रणालीमधील दोषांमुळे पक्षकारांना विनाकारण मोठा भुर्दंड सहन करावा लागलेला आहे. तरीही या गलथान कारभाराचे कुणालाही गांभीर्य नाही असे दिसते. वास्तविक पाहता, नोंदणी विभाग नागरिकांचे दस्तनोंदणी करताना पक्षकारास आधी मोठे शुल्क आकारत असूनही योग्य सुविधा देण्याबाबत उदासीन आहे. शिवाय प्रणालीमध्ये असलेल्या दोषांमुळे दस्त नोंदणी होत नसल्याने या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी बसून आहेत, असा दावाही अॅड. आसावा यांनी केला.

Post a Comment

Previous Post Next Post