मंदिराची दारे उघडून घटस्थापना करणार; भाजप नेते आक्रमक


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

राज्यातील मंदिरे उघडण्यात यावी, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी आग्रही भूमिका घेत आहे. अनेकदा आंदोलने केली. मात्र राज्य सरकारने मंदिरांची दारे उघडण्याचा अद्याप निर्णय घेलेला नाही. २८ ऑगस्ट रोजी केलेल्या घंटानाद आंदोलनावेळी नवरात्र उत्सवापर्यंत मंदिरे उघडण्यास परवानगी दिली नाही तर आम्ही मंदिरे उघडू, असा इशारा दिला होता. त्यानुसार शनिवारी (दि.१७) घटस्थापनेच्या दिवशी गौरीशंकर मित्र मंडळाच्यावतीने गौरीघुमट येथील तुळजाभवानी मातेचे मंदिर उघडून विधिवत घटस्थापना करणार आहोत. आता भाविकांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याा भूमिकेचा निषेध करत आम्ही मंदिरात घटस्थापना करणार आहोत. आम्ही आता शांत बसणार नाही. सोंग घेऊन झोपलेल्या तीन पायाच्या लंगड्या सरकारला जाग आणण्यासाठी आक्रमक भूमिका घेणार आहे. याचा जो परिणाम होईल त्यास सरकार जबाबदार राहील, असा इशारा गौरीशंकर मित्रमंडळाचे प्रमुख व भाजप नेते वसंत लोढा यांनी दिला आहे.

राज्यातील व शहरातील मंदिरे अद्याप बंद असल्याने शनिवारी होणारी घटस्थापना उत्सव सार्वजनिक पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय गौरीशंकर मित्रमंडळाने घेतला आहे. मंडळाचे संस्थापक वसंत लोढा यांनी याबात पत्रक काढून राज्य सरकारला इशारा दिला आहे.

लोढा म्हणाले की, केंद्र सरकारने देशातील मंदिरे उघडण्याची यापूर्वीच परवानगी दिली आहे. त्यानुसार देशातील सर्व प्रमुख मंदिरे उघडली असून, त्याठिकाणाहून करोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी सर्व काळजी घेली जात आहे. मात्र, महाराष्ट्रातच मंदिरे बंद ठेवून केंद्र सरकारच्या आदेशास मुठमाती दिली आहे. मंदिरांची दारे उघडण्यासाठी हिंदुत्ववादी पक्षाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्यात हिंदुनाच आंदोलने करावी लागत आहेत. शिवसेनेला स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांचा विसर पडला आहे. उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व आता बेगडी झालेले आहे. त्यामुळेच त्यांना असे अविचार सुचत आहेत. सर्व काही सुरु करत आहेत, मग मंदिरेच का बंद? काँग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नादी लागलेल्या शिवसेनेने हिंदुत्वाला सोडचिठ्ठी दिली आहे, हे उद्धव ठाकरे यांनी जाहीर करावे. मंदिरांचे दारे उघडण्यासाठी आम्ही सर्व भाविकांबरोबर आहोत. 

हिंदू धर्माचे शक्ती स्थान असलेली मंदिरे अजून का बंद? सरकारला जाग येण्यासाठी आम्ही आता जागृत झालो आहोत. सर्व हिंदू भाविकांनीही आता जागृत व्हावे. भाविकांनी करोनापासून वाचण्यासाठी सर्व नियमांचे पालन करून या घटस्थापना सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन विश्वहिंदू परिषदेचे मठमंदिर समितीचे अध्यक्ष हरिभाऊ डोळसे व मंदिर सुरक्षा समितीचे बापू ठाणगे यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post