राज्यपाल नियुक्त आमदार : 'ती' दोन नावे यादीत आहेत की नाही? उत्सुकता वाढली

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नावे महाविकास आघाडी मंत्रिमंडळाने अंतिम केली असली तरी यातील नावांबाबत शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीनही पक्षांकडून गुप्तता पाळली गेल्याने या यादीत नगर जिल्ह्यातील चर्चेत असलेली दोन नावे आहेत की नाही, याची उत्सुकता जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात आहे. राज्य मंत्रिमंडळाने अंतिम केलेली १२ आमदारांच्या नावांची यादी राज्यपालांकडे गेल्यावर ते त्याबाबत काय भूमिका घेतात, यावरून या नावांबाबतचे अंतिम स्पष्टीकरण होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येते.

राज्यपाल नामनिर्देशित सदस्य हे साहित्य, कला, विज्ञान, सहकार, सामाजिक कार्य या क्षेत्रांतील विशेष ज्ञान व अनुभव संपन्न असावेत अशी संविधानात तरतूद आहे. त्याचा आधार घेत, राज्यपालांनी राज्य सरकारला नव्याने नावांची शिफारस करण्याचे कळविले. राज्यपालांची सूचना सरकारला मान्य करावी लागली आहे. त्यामुळे आता नव्याने नावे अंतिम केल्यानंतर आता ती पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. या नावांमध्ये राजकीय मंडळी आहेत की, अन्य विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत, याबाबत चर्चा रंगल्या आहेत. विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त १२ जागा एप्रिल ते जून या दरम्यान मुदत संपल्याने रिक्त झाल्या होत्या. राज्य सरकारकडून त्या जागांवर नियुक्त्यांसाठी काही नावे पाठविण्यात आली होती; परंतु संविधानातील तरतुदीकडे बोट दाखवत राज्यपालांनी विधान परिषदेवर राजकीय नियुक्त्या करण्यास नकार दिला होता. त्यामुळे आता राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या १२ सदस्यांच्या नियुक्तीसाठी शिफारस करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकताच मंजूर करण्यात आला. मात्र, राज्यपालांना पाठविण्यात येणाऱ्या यादीत नेमकी नावे कोणाची आहेत, याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये विधान परिषदेच्या १२ जागांचे समान वाटप करण्यात आले. तीनही पक्षांत विशेषत: काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विधान परिषदेवर वर्णी लागण्यासाठी इच्छुकांची गर्दी होती. त्यातून दोन्ही पक्षांनी प्रत्येकी चार नावे निश्चित केल्याचे समजते. शिवसेनेचीही चार नावे निश्चित झाल्याचे कळते. मंत्रिमंडळ बैठकीत विधान परिषदेवर १२ सदस्यांच्या नियुक्तीची शिफारस करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. लवकरच नावांची यादी राज्यपालांना पाठविण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.

नगर जिल्ह्यातून राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे व प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांची अनुक्रमे राष्ट्रवादी व काँग्रेसच्या कोट्यातून नावे अपेक्षित आहेत. त्यामुळे अंतिम यादीत ही दोन नावे आहेत की नाही, याची उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर नगरचे शिवसेनेचे दिवंगत माजी आमदार अनिलभय्या राठोड यांचे चिरंजीव विक्रम राठोड यांना शिवसेनेच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार करण्याची मागणी दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांच्यासह काही नगरसेवकांनी केली आहे व तसे पत्र मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. त्यामुळे या नावाचा विचार शिवसेनेने केला की नाही, याचेही स्पष्टीकरण अंतिम नावांची यादी जाहीर झाल्यानंतरच होणार आहे. पण सध्यातरी या राज्यपाल नियुक्त आमदारकीची जोरदार चर्चा जिल्ह्यात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post