नगर अर्बन बँकेची २२.९० कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
मशिनरी खरेदीसाठी कर्ज घेऊन कोणत्याही प्रकारची मशिनरी खरेदी न करता परस्पररित्या स्वतःच्या फायद्यासाठी रक्कम वापरून नगर अर्बन बँकेची 22 कोटी 90 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .माजी खासदार दिलीप गांधी यांच्या आधिपत्याखाली अनेक वर्षे ही बँक होती. प्रशासक नियुक्तीनंतर नगर अर्बन बँकेतील प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यामुळे जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडालेली आहे.

आरोपींमध्ये डॉक्टर विनोद श्रीखंडे ,डॉक्टर रवींद्र कवडे, डॉक्टर भास्कर सिनारे, डॉक्टर निलेश शेळके ,गिरीश अग्रवाल, निर्मल एजन्सी ,स्पंदन मेदडीकेअर (पुणे ) यांचा समावेश आहे.

नगर अर्बन बँकेमध्ये डॉक्टरांनी एकमेकांना जामीन राहून रुग्णालया करिता नवीन मशिनरी खरेदी करायची, असे सांगून पुण्याच्या स्पंदन मेडिकेअर तसेच निर्मल एजन्सी यांच्याशी संगनमत करून नगर अर्बन बँकेमध्ये 22 कोटी 90 लाख रुपयांची कर्ज घेतले होते. सदर कर्ज बँकेने केडगाव व मार्केट शाखेतून त्यांना उपलब्ध करून दिले होते. कर्ज संबंधित खातेदारांना दिल्यानंतर हप्ते थकले होते. बँकेने थकबाकी पोटी तगादा सुरु केला होता. या प्रकरणाच्या तपासामध्ये अनेक बाबी पुढे आल्या होत्या. संबंधित एजन्सीने कोणत्याच प्रकारची मशनरी घेतली नाही व रुग्णालयाच्या मध्ये ती मशिनरी आणली नाही, ही बाब उघड झाली होती. या घटनेमध्ये डॉक्टर व इतर एकमेकांना जामीन राहिलेले होते. कर्जाच्या रकमेतून हॉस्पिटल मशीन घ्यायची आहे, असे प्रकरण दाखल केले होते. मात्र, मशिनरी खरेदी न करता निर्मल व स्पंदन मेडिकेअर यांच्या बरोबर संगनमत करत डीलरचा खात्यातून परस्पर पैशाची विल्हेवाट लावल्याचे निदर्शनास आले होते. बँकेची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. सदरची कर्जाची दिलेली रक्कम थेट रोहिणी सिनारे व उज्वला कवडे यांच्या खात्यामध्ये जमा करून त्याची सर्वांनी मिळून परस्पर विल्हेवाट लावली, असेही समोर आले, असे बँकेचे व्यवस्थापक महादेव साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये सात जणांविरुद्ध फसवणुकीचा तसेच कलम 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज महाजन हे करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post