एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
कोरोना संक्रमणाचे ‘कॉण्टॅक्ट ट्रेसिंग’साठी मोबाईलवर आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सातत्याने केले जात आहे. मात्र, कोट्यवधी जनतेने डाऊनलोड केलेले हे अॅप नेमके बनविले कोणी हे आता सरकारलाच माहीत नाही. यामुळे केंद्रीय माहिती आयोगाने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्रालय, नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटर (एनआयसी) यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सौरव दास यांनी एनआयसी, नॅशनल ई-गर्व्हनस डिव्हीजन आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाकडे ‘आरटीआय’ अंतर्गत अर्ज केला होता. दोन महिने पाठपुरावा करूनही आरोग्य सेतू अॅप कोणी बनविले हे माहित नाही, असे उत्तर दास यांना या मंत्रालयांनी दिले. दास यांनी माहिती आयोगाकडे तक्रार केली. याची दखल घेऊन माहिती आयोगाने अॅप कोणी बनविले हे तुम्हाला माहित कसे नाही? असे अजब उत्तर कसे देऊ शकता? असा सवाल करून नोटीस बजावली आहे.
‘अॅप’वर कोणाचा उल्लेख
आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड केल्यानंतर हे अॅप एनआयसी आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाने (आयटी) तयार केल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार अॅप बनविता आणि माहित नाही कसे म्हणता? याबाबत लेखी उत्तर द्या असे आदेश मुख्य माहिती आयुक्त एन. सरण यांनी दिले आहेत.
जनतेवर ‘वॉच’ ठेवला जातो?
- कोरोना संक्रमित रुग्ण आपल्या परिसरात, आजूबाजूला कोण आहेत याची माहिती मिळावी आणि खबरदारी पाळण्यात यावी यासाठी ‘आरोग्य सेतू’ मोबाईल अॅप डाऊनलोड करण्याचा प्रचार पंतप्रधान मोदींसह सरकारकडून सातत्याने केला जात आहे. मात्र, हा अॅप डाऊनलोड करताना संबंधित व्यक्तीची खासगी माहिती विचारली जाते. एकाप्रकारे नागरिकांवर वॉच ठेवला जात असल्याचा आरोप यापूर्वी अनेकदा झाले आहेत.
- काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी हा अॅप सरकारने बनविल्याचा आरोप केला होता. या अॅपमुळे डेटा सुरक्षा आणि नागरिकांच्या खासगी स्वातंत्र्याबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
Post a Comment