‘रिपब्लिक’ला ‘बजाज’चा दणका, जाहिराती बंद!एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
अधिकाधिक जाहिराती पदरी पाडून घेण्यासाठी टीआरपीचे नकली आकडे दाखविणाऱ्या वाहिन्यांचे बिंग मुंबई पोलिसांनी फोडले आहे. टीआरपी घोटाळ्यात 'रिपब्लिक' वृत्तवाहिनीसह ‘फक्त मराठी’ आणि ‘बॉक्स सिनेमा’ या वाहिन्यांची नावे आली आहेत. त्यानंतर आता या तीन वाहिन्यांच्या जाहिराती बंद करण्याचा निर्णय ऑटो क्षेत्रातील मोठी कंपनी बजाज ऑटोने घेतला आहे. बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी तीन वाहिन्यांना ब्लॅकलिस्ट केल्याचे आज जाहीर केले. आणखीही काही कंपन्या या तिन्ही चॅनेल्सवरील जाहिराती बंद करण्याच्या विचारत आहेत. त्यामुळे टीआरपी रॅकेटमधील या वाहिन्यांच्या महसुलावर परिणाम होणार आहे. 

काय म्हणाले राजीव बजाज
सशक्त ब्रँड हा आमचा पाया आहे. त्यावर आम्ही आमचा व्यवसाय मजबूत केला आहे. केवळ भक्कम व्यवसाय हा आमचा अंतिम हेतू नाही. समाजाला आम्ही देणं लागतो. मी ’बजाज’ च्या वतीने स्पष्ट करतो की जो ब्रँड किंवा संस्था संशयाच्या भोवऱयात आहे, त्यांच्यासोबत आमचा ब्रँड जोडला जाणार नाही, असे बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी सांगितले.

इन्कम टॅक्स, जीएसटी आणि आर्थिक गुन्हे शाखाही मागावर
टीआरपी घोटाळा प्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या आणखी चार वरिष्ठ अधिकाऱयासह हंसा कंपनीच्या दोघाना मुंबई क्राईम ब्रँचने चौकशीसाठी समन्स पाठवले आहेत. रविवारी त्या सहा जणांची चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणात मुंबई पोलीस आता आयकर विभाग, जीएसटी, आर्थिक गुन्हे शाखेची मदत घेणार आहेत. आज क्राईम ब्रँचने जाहिरात कंपनीच्या दोन वरिष्ठ अधिकाऱयाची आठ तास चौकशी केली. सकाळी अकराच्या सुमारास दोन जाहिरात कंपनीचे वरिष्ठ अधिकारी गुन्हे शाखेत जबाब नोंदवण्यास आले. त्याची आठ तास चौकशी केली. पोलिसांनी जाहिरात कंपनीकडून गेल्या दोन वर्षात चॅनल्सना एकूण किती जाहिराती दिल्या गेल्या. त्यांचा दर काय होता, आदी तपशील मागवला आहे. जाहिरात कंपनी तो अहवाल पोलिसांना येत्या काही दिवसात सादर करणार आहे. त्या अहवालानंतर काही बाबी उघड होतील. आज मुंबई पोलिसांनी रिपब्लिक नेटवर्कच्या चार वरिष्ठ अधिकारी आणि हंसा कंपनीच्या दोघांना चौकशी साठी समन्स पाठवले आहे. त्या सहाही जणांना रविवारी सकाळी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.

मुंबई पोलिसांची 6 पथके
टीआरपी घोटाळ्यात काही आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी 6 पथके तयार केली असून ती वेगवेगळ्या राज्यात गेली आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post