विखेंच्या कार्यक्रमाकडे काँग्रेसने फिरवली पाठ; राजकीय चर्चेचा झाला विषय

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

ज्यांनी आपली उभी हयात काँग्रेस पक्षात व्यतित केली, पाच-सहा वेळा खासदारकी काँग्रेसच्या तिकिटावर केली व राजकीय अपरिहार्यतेने शिवसेनेत काही काळ घालवल्यानंतर पुन्हा काँग्रेसचा विचारच महत्त्वाचा मानून पुन्हा काँग्रेसमध्ये म्हणजे स्वगृही परत येणे इष्ट मानले, त्या पद्मभूषण (स्व.) बाळासाहेब विखे यांच्या आत्मचरित्र प्रकाशनाच्या कार्यक्रमाकडे काँग्रेसने मात्र पाठ फिरवली. प्रदेश काँग्रेससह काँग्रेसचे मंत्री, जिल्ह्यातील आमदार वा पदाधिकारीही या कार्यक्रमाकडे फिरकले नाहीत. श्रीगोंद्याच्या अनुराधा नागवडे यांची उपस्थिती होती, पण ती विखे कुटुंबियांशी असलेल्या कौटुंबिक संबंधाने असावी असे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रवरानगरच्या कार्यक्रमाकडे काँग्रेसजनांनी फिरवलेली पाठ जिल्ह्यात चर्चेचा विषय झाला आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्व. विखे यांनी लिहिलेल्या 'देह वेचावा कारणी' या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी दिल्लीत झाले. शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही व्हर्चुअल पद्धतीने मुंबईतून या कार्यक्रमात सहभागी झाले होते तर यानिमित्त प्रवरानगरला झालेल्या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे, आ. बबनराव पाचपुते, मोनिका राजळे, आशुतोष काळे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, शिवाजीराव कर्डिले, वैभव पिचड, बाळासाहेब मुरकुटे, हर्षवर्धन पाटील, पांडुरंग अभंग, सुरेश धस, अण्णासाहेब म्हस्के, खा. सदाशिव लोखंडे, नगरचे महापौर बाबासाहेब वाकळे, माजी खासदार दिलीप गांधी, श्रीरामपूरच्या नगराध्यक्ष अनुराधा आदिक, पोपटराव पवार, सीताराम गायकर, सुनंदा पवार, प्रा. भानुदास बेरड असे बहुतांश सर्व प्रमुख पक्षांचे नेते उपस्थित होते. काँग्रेसजनांपैकी कोणीही आले नाही व त्याची चर्चा कार्यक्रम स्थळी होती.

विखेंनी व्यक्त केली खंत
काँग्रेस नेत्यांच्या अनुपस्थितीबद्दल आ. राधाकृष्ण विखे यांनीही खंत व्यक्त केली. 'सिमित दृष्टीकोनातून पाहण्याच्या दृष्टीनेच पक्षाची (काँग्रेस) आज महाराष्ट्रात ही अवस्था झाली आहे', अशी सूचक टिपणीही त्यांनी केली. 'काही गोष्टींकडे राजकारणापलीकडे पाहण्याची गरज'ही त्यांनी व्यक्त केली.

गौरव व काँग्रेस टीका चर्चेत
पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री ठाकरे, विरोधी पक्ष नेते फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील आदींनी आपल्या भाषणात (स्व.) विखे यांच्या कार्यपद्धतीचे भरभरून कौतुक केले व त्याचवेळी (स्व.) विखेंच्या सेना प्रवेशाच्या विषयावरून 'तिकडे (काँग्रेस) कोंडलेला हिरा शिवसेनेने मंत्रिपदाच्या कोंदणात बसवला', अशा शब्दातील ठाकरेंचे भाष्य एकप्रकारे काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीकाच करून गेल्याची चर्चा कार्यक्रम स्थळी होती. 'राजनीती को समाज के सार्थक बदलाव मे लानेकी उनकी सोच, ये उनकी खासियत दिखाती है', अशा शब्दात मोदींनी (स्व.) विखेंच्या कार्याचा गौरव केला तर 'इच्छाशक्ती, जिद्द व मेहनत यातून परिस्थिती बदलाचे दर्शन (स्व.) विखेंनी आपल्या कार्यातून दाखवल्याचे' गौरवोदगार मुख्यमंत्री ठाकरेंनी व्यक्त केले. 'पाणी कोणत्याही जातीधर्माचे नाही तर सर्वांचे आहे, या विचारांतून पाणी परिषदेला सर्वपक्षीयांना बोलावणाऱ्या (स्व.) विखेंचे दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज' विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी मांडली. '(स्व.) विखेंनी गोरगरीब व शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना आधी स्वतः राबवल्या व मग शासनाला राबवण्यास भाग पाडल्या', असे गौरवोदगार प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी व्यक्त केले. खा. डॉ. सुजय विखे यांनी सूत्रसंचालन केले. आ. राधाकृष्ण विखे यांनी प्रास्ताविक केले तर राजेंद्र विखे यांनी आभार मानले. नगरचे ज्येष्ठ पत्रकार महादेव कुलकर्णी यांनी (स्व.) विखे यांच्या जीवनावर लिहिलेल्या 'मुलखावेगळा माणूस' या पुस्तकाचेही यावेळी प्रकाशन झाले.

Post a Comment

Previous Post Next Post