भाजपची सत्ता नसलेल्या भागात नागरिकांना लस मिळणार नाही?


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

बिहार विधानसभा निवडणुकीत प्रचारात आता कोरोनाने शिरकाव केला आहे. सत्तेवर आल्यास बिहारच्या जनतेला मोफत कोरोना लस देऊ असे आश्वासन भाजपने जाहीरनाम्यात दिले आहे. दरम्यान, यावर विरोधकांनी भाजपला घेरले असून, लसीचे राजकारण करीत असल्याचा आरोप केला आहे. भाजपची सत्ता नसलेल्या भागातील नागरिकांना लस मिळणार का नाही, असा सवाल विरोधकांनी उपस्थितीत केला आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज अकरा संकल्प असणारा भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यात सत्ता आल्यास 3 लाख शिक्षकांची भरती करणार, बिहारमध्ये आयटी हब उभारून 5 लाख रोजगार देणार, 2022 पर्यंत 30 लाख लोकांना पक्की घरे बांधून देणार, गहू, तांदुळाबरोबरच डाळीही सरकार विकत घेणार, मेडिकल, इंजिनिअरिंगचे शिक्षण हिंदीत देणार, याबरोबरच कोरोनाची लस राज्यातील सर्व जनतेला मोफत देणार असे आश्वासन जाहीरनाम्यात दिले आहे.

भाजपला मते दिली नाहीत; तर लस मिळणार नाही का?
भाजपकडून कोरोना लसीचे राजकारण केले जात असल्याचा आरोप करीत विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे. भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांना लस मिळणार नाही का? भाजपला मत दिले नाहीत तर लस देणार नाही का, असा सवाल ‘आप’ने केला आहे.

लोकांनी सोशल मीडियावर vaccineelectionism असा हॅशटॅग सुरू केला आहे. लस ही लोकांचे जीव वाचविण्याचे साधन आहे. लस मिळणे हा लोकांचा अधिकार आहे. मात्र, भाजपकडून निवडणुकीत लाभ मिळण्यासाठी लसीचा वापर केला जात आहे. लसीचे लॉलीपॉप भाजप वाटत आहे, अशी टीका काँग्रेस नेते जयवीर शेरगील यांनी केला आहे.

भाजप लसीसाठी पक्षाच्या तिजोरीतून पैसे देणार आहे का? सरकारी तिजोरीतून पैसे येत असतील तर लस फक्त बिहारला मोफत कशी मिळू शकते? असा सवाल नॅशनल काॅन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी केला आहे.

तेजस्वी यादव यांच्या सभांना तुफान प्रतिसाद
बिहारमध्ये जदयुचे सर्वेसर्वा नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीए आणि राजदचे अध्यक्ष तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महागठबंधन यांच्यात थेट लढत आहे. सध्या निवडणूक प्रचारात महागठबंधनने (महाआघाडी) आघाडी घेतल्याचे चित्र आहे. 31 वर्षीय तेजस्वी यादव यांच्या सभांना तुफान प्रतिसाद मिळत आहे.

कोरोना असतानाही लोक प्रचंड गर्दी करत असून, दिवसाला 10 ते 12 सभा तेजस्वी यादव घेत आहेत. लालुप्रसाद यादव हे तुरूंगात असून, तेजस्वी यांच्या खांद्यावरच महाआघाडीची धुरा आहे. सत्तेवर आल्यानंतर 10 लाख तरूणांना रोजगार हे आश्वासन त्यांनी दिले आहे.

तेजस्वी यांच्या सभांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद, त्याची होणारी चर्चा पाहून ‘एनडीए’तील जदयु, भाजपची चिंता वाढल्याचा राजकीय निरिक्षकांचा अंदाज आहे. दरम्यान, तेजस्वी यांचे भाऊ तेजप्रताप यादव यांच्या सभांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post