भाजप करणार गावो-गावी ट्रॅक्टर पूजन; येत्या सोमवारपासून सुरुवातएएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : केंद्र सरकारने नुकत्याच संमत केलेल्या तीन कृषि विधेयकांच्या समर्थनार्थ तसेच विरोधकांनी दिल्लीत ट्रॅक्टर जाळण्याच्या केलेल्या घटनेच्या निषेधार्थ प्रदेश भाजपद्वारे गावा-गावांतून ट्रॅक्टर पूजन सोहळा होणार आहे. याची सुरुवात येत्या सोमवारी (१२ ऑक्टोबर) होणार आहे.

नुकतीच कृषी विधेयकांना लोकसभेत मंजुरी दिली. या विधेयकांमुळे शेतकऱ्यांना देशांतर्गत स्पर्धात्मक बाजारपेठेशी जोडण्याचा निर्णय झाला. स्वातंत्र्यानंतर ७० वर्षांनी शेतकऱ्याला सर्व प्रकारच्या जोखडातून मुक्त करण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केल्याचा दावा भाजपने केला असून, विरोधी पक्षांना हे सहन होत नसल्याने त्यांनी पुन्हा दलालांची दलाली करण्याचे धोरण अवलंबिले व या विधयेकांना विरोध सुरू केला, असा आरोप केला आहे. या विरोधकांनी एवढी खालची पातळी गाठली की मागील आठवडयामध्ये दिल्ली येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चक्क ट्रॅक्टर जाळला. पण आपल्या संस्कृतीमध्ये शेतीमध्ये काम करणाऱ्या बैलांची पूजा केली जाते, शेती औजारांची पूजा करतो तसेच सध्या बैलाची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. त्यामुळे बळीराजाची देवता असलेले बैल, ट्रॅक्टरची पूजने गावो-गावी करण्याचा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने घेतल्याने महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाच्यावतीने बळीराजा सन्मान, ट्रॅक्टर पूजन व भव्य रॅलीचे आयोजन सोमवारी 12 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वरवंड ते केडगाव चौफुला दरम्यान आयोजन केले आहे व समारोप चौफुला येथे होणार आहे. यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.अनिल बोंडे , आ. सुजितसिंह ठाकुर , आ.राहुल कुल , गणेश भेगडे, हर्षवर्धन पाटील, बाळा भेगडे, मकरंद कोरडे, सुधीर दिवे, आनंदराव राऊत, धर्मेंद्र खांडरे उपस्थित राहणार आहेत. शेतकऱ्यांनी कृषी विधयेकांचे समर्थनार्थ आपल्या ट्रॅक्टरसह उपस्थित राहण्याचे आवाहन या कार्यक्रमाचे संयोजक किसान मोर्चाचे सरचिटणीस वासुदेव काळे यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post