कॉफी पिण्याचे आहेत ‘हे’ फायदे..

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने होते. मात्र, रिकाम्या पोटी चहा, कॉफी घेणे योग्य नसल्याचेही सांगण्यात येते. तर सकाळी चहा घेणे चांगले की कॉफी यावरही अनेकदा चर्चा होतात. हिंदुस्थानात चहाचे चाहते जास्त आहेत. मात्र, कॉफीलाही अनेकांची पसंती असते. 1 ऑक्टोबरला जागतिक कॉफी दिन साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने कॉफी पिण्याचे फायदे जाणून घेऊ या.

चहा, कॉफी घेतल्याने मरगळ जाऊन उत्साह आणि उर्जा मिळते. मात्र, चहापेक्षा कॉफीने लवकर उत्साही वाटते. त्यामुळे अनेकजण दिवसाची चांगली सुरूवात होण्यासाठी सकाळी कॉफीला पसंती देतात. दिवसातून दोन ते तीनवेळा साखर आणि दूधाशिवाय नुसतीच कॉफी म्हणजेच ब्लॅक कॉफी घेतल्यास यकृताशी संबधित आजारांचा धोका कमी होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. अशी कॉफी पिण्याने यकृताच्या कर्करोगाचा धोकाही कमी होतो. यकृताशी संबंधित काही त्रास असल्यास ब्लॅक कॉफी घेण्याने फायदा होतो.

वजन कमी करून सडपातळ राहण्यासाठी अनेकजण विविध उपाय करतात. मात्र, दररोज कॉफी घेण्याने वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. कॉफीमध्ये असलेल्या मॅग्नेशियम आणि पोटॅशियममुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. हृदयरोगाशी संबंधित काही त्रास असल्यासही कॉफी घेण्याचा फायदा होतो. कॉफी पिण्याने हृदयरोगाचा धक्का बसण्याचा धोका कमी होतो. देशात सध्या मधुमेहाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे अशा रुग्णांना चहा कॉफी टाळतात किंवा शुगर फ्रीचा वापर करतात. मात्र, अशा रुग्णांनी बिनासाखरेची कॉफी घेतल्यास मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. कॉफीत असलेले कॅफीन रक्तातील साखरचे प्रमाण वाढू देत नाही. त्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो.

कॉफी पिण्याने दृष्टी सुधारते. त्याचप्रमाणे त्वचा तजेलदार होते. डोळ्याखालची काळी वर्तुळेही कॉफी पिण्याने कमी होतात. त्याचबरोबर कॉफीचा फेसपॅक बनवून त्याचा वापर केल्यास चेहरा उजळ होतो. तसेच खाण्याचा सोडा आणि कॉफी यांचे मिश्रण दातांवर लावल्यास दातांवरील डाग कमी होतात. मात्र, कॉफीमध्ये कॅफिन हा उत्तेजनक घटक असल्याने कॉफीचा अतिवापर टाळावा.

(ही बातमी जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी 'एएमसी मिरर'चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)


Post a Comment

Previous Post Next Post