...म्हणून सुशांतसिंग प्रकरण काढले; मंत्री चव्हाणांची केंद्र सरकारवर टीका

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

''शेतकरी व गोरगरीबांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून सुशांतसिंग प्रकरण,रिया चक्रवती,टी.आर.पी प्रकरण सुरू आहे. मागील 5 वर्षात केंद्राने आयात निर्णयासह सर्व धोरणे भांडवलदारांसाठीच घेतली आहेत. सहकार मोडीत काढण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे अनेक साखर कारखाने बंद पडले'', असा आरोप सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी गुरुवारी संगमनेर येथे केला. ''शेतकर्‍यांना एफआरपी दिली पाहिजे. मात्र उत्पादन खर्च धरून साखरेची आधारभूत किंमत ठरवली जात नाही.त्यामुळे कारखाने अडचणीत आले आहे. या कारखान्यांना महाविकास आघाडी सरकारने 500 कोटी रुपये कर्ज उपलब्ध करून देण्याची हमी घेतली आहे'', असेही चव्हाण यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळेच राज्यातील शेतकरी व सहकार संकटात सापडला असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या 54 व्या गळीत हंगामाची सुरुवात मंत्री चव्हाण यांच्या हस्ते झाली. यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच.के.पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह खा.राजीव सातव,आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, आखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव वामसी चांद रेड्डी,आशिष दुआ, बी.एम. संदीप, युवक काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, बाजीराव खेमनर,अ‍ॅड.माधवराव कानवडे,रणजितसिंह देशमुख, मोहनदादा जोशी, पृथ्वीराज साठे, कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ओहोळ,उपाध्यक्ष संतोष हासे,शंकर खेमनर, शिवाजीराव थोरात, बाळासाहेब साळूंखे, ज्ञानेदव वाफारे, मीराताई शेटे, हेमंत ओगले,इंद्रजित थोरात, सुनंदा जोर्वेकर, लक्ष्मण कुटे,कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर उपस्थित होते. 

''सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकारात आदर्श तत्वे रुजविली. त्यांचे जनसामान्यांच्या विकासाचे संस्कार घेवून मंत्री बाळासाहेब थोरात राज्यात यशस्वीपणे नेतृत्व करत आहे. सहकारातून भाऊसाहेबांनी या भागाचे नंदनवन केले. समृध्द शिखर संस्था उभ्या केल्या. सहकार या विभागाचे वैभव असल्याचे'' गौरवोदगार मंत्री चव्हाण यांनी व्यक्त केले.

शेतकरी व कामगारांची दिवाळी आनंदी
यावर्षी कोरोनाचे संकट आहे व सर्वत्र आर्थिक मंदी आहे. मात्र, संगमनेर कारखान्याने यावर्षीही आपली उज्ज्वल परंपरा जपली असून दिवाळीत कामगारांना 20 टक्के बोनस म्हणून 5 कोटी 38 लाख 75 हजार तर 30 दिवसांचे सानुग्रह अनुदान 2 कोटी 68 लाख, शेतकर्‍यांना ठेवींचे 1 कोटी 48 लाख व सभासदांना 15 किलो साखर देण्यात येणार असल्याचे मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले. 2022 पर्यंत निळवंडे कॅनॉलचे पाणी आणण्याचे काम केले जाणार असल्याचे सांगून ते म्हणाले, मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दुसर्‍या दिवशी निळवंडे कॅनॉलच्या कामाला सुरुवात केली. निळवंडेच्या कामाला गती दिली. कोरोना संकटामुळे आर्थिक अडचणी आहे. मात्र सर्व संकटातून मार्ग काढत 2022 पर्यत दुष्काळी भागाला कालव्यांद्वारे पाणी देण्याचा मानस असल्याचेही थोरात यावेळी म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post