एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
सध्याच्या जमान्यात भ्रष्टाचार हा जवळपास शिष्टाचार झाला असला तरी अजूनही काही ठिकाणी संघटितपणे भ्रष्टाचाराला प्रखर विरोध केला जातो. गडचिरोली जिल्ह्यातील मेंढा गावची भ्रष्टाचाराविरुद्धची अनोखी 'गांधीगिरी' सोशल मिडियातून व्हायरल होत आहे व या गांधीगिरीला चांगले लाईक्सही मिळत आहेत. सोशल मिडियातून ''गोष्ट मेंढा गावाची ! लढाई भ्रष्टचारांशी'' अशा नावाची पोस्ट फिरत आहे. नगरचे आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य लक्ष्मीकांत कोर्टीकर यांनी ती ''एमएमसी मिरर''शी शेअर केली आहे. या पोस्टमध्ये मेंढा गावाने भ्रष्टाचाराविरुद्ध दिलेली संघटित लढाईची माहिती दिली आहे. ती वाचल्यावर गावकऱ्यांच्या धाडसाचे सोशल मिडियातून कौतुक होत आहे.
या पोस्टमधील माहितीनुसार-गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तालुक्यात मेंढा नावाचे आदिवासीबहूल गाव आहे. या गावाने त्यांच्या ग्रामसभेत असा एक ठराव केला आहे की, गावातील एकही गावकरी त्याच्या सरकारी कामासाठी कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्याला लाच देणार नाही, असा. तसेच कोणत्याही गावकऱ्यांचं अडलेलं सरकारी काम हे पूर्ण गावाचं काम समजलं जाईल व पूर्ण गांव मिळून ते काम पूर्ण करून देईन, असेही या ठरावात स्पष्ट केले गेले आहे. इतर गावातील गावकऱ्यांप्रमाणे मेंढा गावातील गावकऱ्यांनाही रेशनकार्ड, उत्पन्नांचा दाखला,जातीचा दाखला,वीज जोडणी, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र अशा कितीतरी कामासाठी तालुका, जिल्हा इत्यादी ठिकाणी सरकारी कार्यालयात जावं लागतं. बऱ्याचदा अशा विविध कामासाठी सरकारी अधिकारी-कर्मचारी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या लाच मागतात. पण मेंढा गावातील ग्रामसभेनं अशा भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांना कसा धडा शिकवायचा याची एक कार्यपद्धती ठरवली आहे.
ती अशी आहे :
जर कोणी सरकारी कर्मचारी-अधिकारी पैसे मागत असेल तर त्याला सांगायचे मी पैसे देतो, पण मी दिलेल्या पैशाची मला पावती द्या. जर सरकारी अधिकारी पावतीही देत नसेल व पैसे मागत असेल तर त्याला पैसे द्यायचे नाहीत व दिवसभर त्यांच्या सरकारी कार्यालयात बसून राहायचं. आपला कागद मिळवणं हा आपला हक्क असल्याने दिवसभर बसूनही जर पैसे (लाच) दिली नाही म्हणून कागद दिला नाही किंवा काम केल नाही तर रात्री ग्रामसभेत त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची तक्रार नोंदवायची. मग दुसऱ्या दिवशी त्या संबंधित अर्जदाराबरोबर गावातले अन्य दहा लोक त्या सरकारी कार्यालयात जातील आणि सरकारी अधिकाऱ्यांना सांगतील की आमच्या ग्रामसभेनं आम्हाला पाठवलं आहे आणि आम्ही एक पै ची सुद्धा लाच देणार नाही. आम्ही तुम्हाला पैसे देऊ पण तुम्ही त्याची पावती दिली पाहिजे. या दहा जणांनाही सरकारी अधिकाऱ्यांनी दाद दिली नाही तर ते परत गावात जातात व गावाच्या ग्रामसभेत दहाजण आपला रिपोर्ट देतात. मग तिसऱ्या दिवशी गावातील सगळे महिला-पुरुष , मुलं-बाळ, तरूण-म्हातारी असा सगळा गांव त्या सरकारी कार्यालयात जातो. पुन्हा तिथं तीच पावतीची अट ठेवली जाते. पैसे दिले जातील पण आम्हाला पावती द्या, असे सगळेजण सांगतात. अशा स्थितीत व कार्यालयात जेव्हा दीड-दोनशे गावकरी आलेले पाहून तिथल्या कर्मचारी व अधिकारी यांची भंबेरी उडते आणि त्या गावाचं वा त्या संबंधित अर्जदाराचं रखडलेलं सरकारी काम झटकन पूर्ण होतं. सुरुवातीला अशा अडलेल्या एका व्यक्तीच्या कामासाठी जेव्हा सगळा गाव धावून जाऊ लागला व सरकारी कार्यालयात मेंढा गावाच्या नावाचा एक नैतिक दबाव निर्माण झाला आहे. एकाला लाच मागितली तर सगळा गांव मदतीला धावून येतो, हे माहिती झाल्यामुळे आता मेंढा गावाचं एकही काम सरकारी बाबू रखडवत नाहीत. तिथले सरकारी अधिकारी मेंढा गावच्या अर्जदारांचं काम आधी पूर्ण करून ठेवतात,'' असे या पोस्टमध्ये स्पष्ट करून पुढे आवाहन केले आहे की, ''मित्र हो, मेंढा गावचं अनुकरण आपल्या गावात आपणही करायला पाहिजे... नाही का? जय भारत.''
Post a Comment