पाण्यात राहणार अर्धे उभे; धनगर समाजाचे आरक्षणासाठी आगळेवेगळे आंदोलन

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज
नदी, बंधारे व तलाव या ठिकाणी पाण्यात अर्धे उभे राहण्याचे (अर्ध जलसमाधी) अनोखे आंदोलन धनगर समाजाद्वारे केले जाणार आहे. येत्या २२ ऑक्टोबरला धनगर समाजाच्या आरक्षण मागणीसाठी जय मल्हार सेनेचे अर्ध जलसमाधी आंदोलन जिल्ह्यातील ३५ गावांतून होणार आहे.

भारतीय राज्य घटनेतील तरतुदीनुसार महाराष्ट्र शासनाने धनगर समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी जय मल्हार सेनेच्यावतीने २२ ऑक्टोबरपासून राज्यव्यापी अर्ध जलसमाधी आंदोलन केले जाणार असल्याची माहिती जय मल्हार सेनेचे सरसेनापती लहुजी शेवाळे यांनी दिली. नगर जिल्ह्यातील राहाता, संगमनेर, श्रीरामपूर, शेवगाव, राहुरी व पाथर्डी तालुक्यातील ३५ गावांमध्ये त्या-त्या गावाजवळील नदी, बंधारे व तलाव या ठिकाणी हे आंदोलन करण्यात येणार आहे. जय मल्हार सेनेचे सरसेनापती शेवाळे व समन्वयक विठ्ठलराव रबदडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीपराज भोंडे, रेवणनाथ शिंदे, संजय राऊत, बाळासाहेब घोडे आदी पदाधिकारी या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत.

यासंदर्भात बोलतांना शेवाळे म्हणाले, भारतीय राज्य घटनेतील अनुसूचित जमातीच्या यादीत ३६ व्या क्रमांकावर असलेले धनगर हीच महाराष्ट्रातील धनगर जमात असल्याचे केंद्र व राज्य सरकारच्या अनेक दस्तावेजातून सिद्ध झाले आहे व ते सर्व राज्यकर्त्यांनी मान्य केले आहे. परंतु केवळ राज्य शासनाच्या उदासीन धोरणामुळे गेल्या २५ वर्षांपासून धनगर समाज आरक्षणपासून वंचित आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी गेल्या २५ वर्षांपासून धनगर समाजाच्या विविध संघटना लोकशाही मार्गाने आंदोलने करून राज्य शासनाचे लक्ष वेधत आहेत. परंतु महाराष्ट्र शासन धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीकडे जाणवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. ही दीड कोटी धनगर समाजाची फसवणूक आहे. त्यामुळे राज्यातील धनगर समाज आता गप्प बसणार नसून २२ ऑक्टोबर पासून राज्यभर जय मल्हार सेनेच्या वतीने अर्ध जलसमाधी आंदोलन करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी राज्य समिती सदस्य काशिनाथ आरगडे, जिल्हा संघटक सोपानराव कांदळकर, संगमनेर तालुका प्रमुख गंगाधर साळवे, बाळासाहेब घोडे, संतोष कांदळकर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post