भाजपचे 'तसे' नाही.. पण 'असे' होणार नुकसान


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचे निश्चित केल्यावर अहमदनगर जिल्हा भाजपमधील कोणताही बडा नेता त्यांच्यासमवेत जाण्याची शक्यता धुसर असल्याने जिल्हा भाजपचे राजकीय नुकसान तसे कमी होण्याची शक्यता आहे. पण सर्वात महत्त्वाचे नुकसान होणार ते सामान्य कार्यकर्त्यांमध्ये स्वतःच्या अस्तित्वाविषयी निर्माण होणाऱ्या शंकेचे! कारण, भाजपमध्ये ४० वर्षे राहून व पक्ष वाढीसाठी तन-मन-धनाने काम करूनही खडसेंसारख्या बड्या नेत्यावर भाजपकडून अन्याय होत असेल तर या पक्षात आपले भवितव्य भविष्यात काय राहील, याची चिंता सामान्य कार्यकर्त्यांना असणार आहे व त्यांच्या मनातील पक्षाविषयीची ही अविश्वासार्हताच पक्ष वाढीला भविष्यात धोकादायक ठरणार असल्याची भावना पक्षातूनच व्यक्त होत आहे.

भाजप नेते नाथाभाऊ खडसे पक्षाला रामराम ठोकणार असल्याचे वृत्त मागील १५ दिवसांपासून चर्चेत होते. या चर्चेची उत्सुकता बुधवारी दुपारी संपली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा सोहळा शुक्रवारी २३ रोजी होणार असल्याचे जाहीर केल्यावर व प्रदेश भाजपनेही खडसेंचा पक्ष सदस्यत्व राजीनामा आल्याचे स्पष्ट केल्यावर जिल्हा भाजपमध्ये अस्वस्थता पसरली. जिल्ह्यातील माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना नाथाभाऊंना राष्ट्रवादी प्रवेशाचा भविष्यात पश्चात्ताप होईल, असे भाकीत केले असले तरी, नाथाभाऊंसारखा पक्षाचा बडा नेता जेव्हा पक्ष सोडतो व राष्ट्रवादीत जातो, तेव्हा राज्यातील महाविकास आघाडी सरकार आता हटणार नाही व सत्तेत येण्याचे भाजपचे स्वप्न आता फक्त स्वप्नच राहील, यावर शिक्कामोर्तब झाल्याची प्रतिक्रिया भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केली. 

खडसेंनी पक्ष सोडल्याने जिल्हा भाजपमधील कोणी नेते त्यांच्या समवेत जाण्याची शक्यता तशी कमी आहे. नेवाशाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व राहुरीचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले तसे खडसे समर्थक मानले जात असले तरी त्यांच्याकडून आताच्या स्थितीत पक्ष सोडण्याचे पाऊल उचलले जाण्याची शक्यता कमी असल्याचा दावाही या नेत्याने केला. दीड-दोन वर्षांनी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषदेच्या आमदारकीच्यावेळी काहीतरी घडू शकेल, असे सूचक भाष्यही या नेत्याने केले. मात्र, खडसेंनी पक्ष सोडल्याने छोटे-मोठे पदाधिकारी व सामान्य कार्यकर्त्यांना पक्षात आता आपल्याला भविष्य असेल की नाही, या शंकेने ग्रासले जाईल व तो पक्षाला मोठा धोका ठरेल, अशी भीतीही या नेत्याने व्यक्त केली.

Post a Comment

Previous Post Next Post