आमच्यादृष्टीने 'खडसे' आता इतिहास झाला : राम शिंदे

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

एकनाथ खडसे भाजप सोडणार असल्याचे समजल्यावर पहिल्या दिवशी बोलताना मी त्यांना (खडसे) पश्चात्ताप होईल, असे बोललो होतो. ज्या दिवशी त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला, त्यादिवशी राष्ट्रवादीने सिंचन घोटाळ्यातील साक्षीदार फोडल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली होती. पण याता त्यांनी (खडसे) राष्ट्रवादीत गेल्याने आमच्यादृष्टीने ते भूतकाळ व इतिहास झाला आहे, अशी प्रतिक्रिया माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केली. आता वर्तमान व भविष्याकडे आम्ही पाहात आहोत व खडसेंच्या जाण्यामुळे नगर जिल्ह्यातील भाजपवर काहीही परिणाम होणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

भाजपच्या कोअर कमिटीची बैठक नुकतीच येथील शासकीय विश्रामगृहावर झाली. खा. डॉ. सुजय विखे, आमदार मोनिका राजळे, आ. बबनराव पाचपुते, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले आदींसह जिल्हा व शहरातील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

..तर, सरकारविरोधात आंदोलन
मागच्यावर्षी (डिसेंबर २०१९) पडलेल्या पावसापेक्षा यंदा पडलेला पाऊस जास्त आहे व शेतीचे नुकसानही जास्त आहे. त्यावेळी आम्ही (भाजप) १० हजार कोटींची मदत दिली होती, त्यामुळे यावेळी पावसाचे व नुकसानीचे जास्ती प्रमाण पाहता महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेली १० हजार कोटींची मदत तुटपुंजी आहे. अनेक ठिकाणी अजूनही पिकांच्या नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत. त्यामुळे सरकारने सरसकट नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली नाही तर भाजप सरकारविरोधात आंदोलन करील, असा इशाराही त्यांनी दिला. शेतीसाठीचा वीज पुरवठा सुरळीत राहावा, कापूस खरेदी केंद्रे सुरू करावीत, जिल्ह्यातील सर्व प्रमुख रस्त्यांची दुरुस्ती व्हावी, महाविकास आघाडी सरकारने केलेली सरसकट कर्जमाफीची घोषणा प्रत्यक्षात आणावी, कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखाची मदत द्यावी, अशा विविध मागण्याही त्यांनी यावेळी केल्या.

Post a Comment

Previous Post Next Post