पद्मभूषण डॉ. विखेंचे आत्मचरित्र घडवणार समाजदर्शन; येत्या बुधवारी मोदींच्या हस्ते प्रकाशन

 

एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
नगर जिल्ह्यासह राज्य व देशाच्या राजकारणात स्वकर्तृत्वाचा अमीट ठसा उमटवणारे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते दिवंगत पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या 'देह वेचावा कारणी' या आत्मचरित्रातून स्वातंत्र्योत्तर काळातील समाजाच्या वाटचालीचे दर्शन होणार आहे. येत्या बुधवारी (१३ ऑक्टोबर) सकाळी १0 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीत या पुस्तकाचे प्रकाशन होणार असून, व्हर्च्युअल माध्यमातून हा प्रकाशन सोहळा याचवेळी प्रवरानगर येथील डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहातही दिसणार आहे. या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. आमदार राधाकृष्ण विखे व नगरचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.


१९६२मध्ये नगर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाच्या माध्यमातून राजकीय वाटचाल सुरू करणाऱ्या पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे यांनी त्यानंतरच्या ४०-४५ वर्षांच्या राजकारणात जिल्हा परिषदेपासून संसदेपर्यंत काम केले. चार दशकांच्या या वाटचालीचा धांडोळा त्यांनी स्वतःच 'देह वेचावा कारणी' या आत्मचरित्रातून घेतला असून, यानिमित्ताने तत्कालीन सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय जीवन, तसेच आपला समाज, गाव व लोकांच्या स्वातंत्रोत्तर वाटचालीचा धांडोळा यात घेतला गेला आहे. राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या आत्मचरित्राला ज्येष्ठ विचारवंत (कै.) अरुण साधू यांनी प्रस्तावना लिहिली असून, आधुनिक भांडवलशाही व अर्थकारणाच्या झपाट्यात सापडलेल्या भारतीय कृषक समाजाच्या अस्तित्वाच्या लढाईची मांडणी या पुस्तकात मार्मिक विवेचन, सडेतोड विचार व ग्रामीण ढंगातून केली असल्याचे गौरवोदगार त्यांनी व्यक्त केले आहे. या आत्‍मचरित्राचे प्रकाशन (कै.) बाळासाहेबांच्या हयातीतच व्‍हावे अशी विखे कुटूंबियांची इच्‍छा होती, परंतू त्‍यांच्‍या तब्‍येतीच्‍या कारणाने ते शक्‍य झाले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आत्‍मचरित्राचे प्रकाशन लोणी येथे येवून करण्याची केलेली विनंती त्‍यांनी मान्‍यही केली होती व १३ एप्रिल २०२० रोजी हा कार्यक्रम ठरलाही होता, परंतू, कोवीड-१९मुळे देशभर लॉकडाऊन सुरू झाल्याने त्यावेळी होवू न शकलेला कार्यक्रम आता पंतप्रधानांच्‍याच हस्‍तेच १३ ऑक्‍टोबर २०२० रोजी व्‍हर्च्‍युअल रॅलीच्‍या माध्‍यमातून होत असल्‍याची माहिती आ. राधाकृष्ण विखे यांनी दिली.

आत्मचरित्र ठरणार राजकीय स्फोटक
शेती, शिक्षण, सहकार आणि पाणी प्रश्‍नासंदर्भात देशाला आपल्‍या विचारातून निर्णय प्रक्रियेची प्रेरणा देणारे लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे यांनी शब्‍दबध्‍द केलेल्‍या 'देह वेचावा कारणी' या आत्‍मचरित्राचे प्रकाशन तसेच प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेचा नामविस्‍तार होत असल्याच्या निमित्ताने प्रगल्भ नेतृत्वाचे हे आत्मचरित्र भावी पिढीसाठी दिशादर्शक ठरणार आहे. जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि ज्येष्‍ठ नेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे यांनी १९६२ पासूनच्‍या आपल्‍या राजकीय, सामाजिक कारकीर्दीचा ऐतिहासिक असा दस्‍तावेज आत्‍मचरित्राच्‍या माध्‍यमातून मांडला आहे. राज्‍याच्‍या आणि देशाच्‍या सर्वच राजकीय स्थित्‍यंतराचा आढावा तसेच वेळोवेळी घ्‍याव्‍या लागलेल्‍या राजकीय भूमिका परखडपणे मांडतानाच राज्‍यासह देशाच्‍या शेती, शिक्षण, पाणी आणि ग्रामीण विकासाच्‍यासंदर्भात तत्‍कालिन राज्‍यकर्त्‍यांच्‍या चुकलेल्‍या धोरणांवरही मतप्रदर्शन केले असल्‍याने या आत्‍म‍चरित्राची उत्‍सुकता सर्वांनाच असल्‍याचे आ. विखे म्‍हणाले. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेच्‍या माध्‍यमातून डॉ.बाळासाहेब विखे यांनी ग्रामीण शिक्षणाचा विस्‍तार करतानाच कौशल्‍य विकासाला दिलेले प्राधान्‍य महत्‍वपूर्ण आहे, या माध्‍यमातूनच संस्‍थेतील दीड लाख विद्यार्थी विविध देशांमध्‍ये वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्‍वीरित्‍या कार्यरत आहेत. हा त्‍यांचा दूरदृष्‍टीचाच भाग होता. त्‍यामुळेच त्‍यांच्‍या शैक्षणिक कार्याची कृतज्ञता व्यक्‍त करण्‍यासाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेचा नामविस्‍तार करण्‍याचा निर्णय विश्‍वस्‍त मंडळाने घेतला असल्‍याचे आ.विखे यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्‍या निमित्‍ताने पंतप्रधान मोदी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांशी या व्‍हर्च्‍युअल रॅलीच्‍या माध्‍यमातून संवाद साधणार आहेत. जिल्‍ह्यात ही व्‍हर्च्‍युअल रॅली सर्वांना पाहता यावी यासाठी जिल्ह्यातील चौदाही तालुक्‍यात स्‍क्रीन आणि प्रोजेक्‍टरची व्‍यवस्‍था करून सर्वांना या कार्यक्रमात सहभागी करून घेणार असल्‍याचे खा.डॉ.सुजय विखे यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post