पनीर खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे!एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

अनेक जणांना दुध किंवा दुग्धजन्य पदार्थ आवडत नाहीत. मात्र, या सगळ्याला अपवाद ठरतं ते म्हणजे पनीर. अनेक जण पनीर आवडीने खातात. त्यामुळे कोणत्याही हॉटेल, रेस्टॉरंट किंवा घरात पनीरपासून तयार केलेले पदार्थ सहज मिळतात. अनेक जणांना पनीर बिर्याणी, पनीर पराठा किंवा पनीरपासून तयार केलेल्या मसालेदार भाज्या फार आवडतात. विशेष म्हणजे चवीने खाणाऱ्या या पनीरचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे हे नेमके फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

१. भुकेवर नियंत्रण राहते
पनीरमध्ये प्रथिने असल्याने ऊर्जा हळूहळू वापरली जाते. यामुळे रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रित राहते. तसेच ती झटकन वाढून कमी देखील होत नाही. त्यामुळे पनीर असलेले पदार्थ खाल्याने बराच वेळ भुकेवर नियंत्रण राहते.

२. शरीराला आवश्यक प्रथिनांचा साठा 
शाकाहारी लोक मांस खात नसल्याने त्यांच्यात प्रथिनांची कमतरता असण्याची शक्यता असते. त्याच्यासाठी प्रथिनांचा साठा असलेले पनीर अतिशय उपयुक्त आहे. १०० ग्रॅम पनीरमधून १८ ग्रॅम प्रथिने मिळतात. प्रथिनांचे प्रमाण संतुलित असल्याने स्नायू बळकट होतात तसेच वजन कमी होण्यासही मदत होते.

३. घातक आजारांपासून बचाव 
कॅन्सर, हृदयविकार यांसारख्या गंभीर आजारांपासूनही पनीरमुळे संरक्षण होते. पनीर असलेले पदार्थ खाल्याने शरीरातील कॅन्सरच्या पेशींची वाढ खुंटते. याचबरोबर रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होण्याचे प्रमाणही कमी होते. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

४. दातांच्या मजबुतीसाठी आवश्यक 
पनीरमध्ये कॅल्शियम जास्त असल्याने दात आणि हाडे मजबूत होण्यास मदत होते. हा दुग्धजन्य पदार्थ असला तरी पनीरमध्ये दुधापेक्षा जास्त पोषक घटक असतात. परंतु पनीरमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असल्याने ज्यांना हृदयरोग, मधुमेह किंवा इतर काही त्रास असतील त्यांनी पनीर डॉक्टरांच्या सल्ल्याने पनीर खावे.

५. चरबी कमी होण्यास उपयुक्त 
प्रथिने आणि कॅल्शियमबरोबरच पनीरमध्ये कॉन्ज्युगेट लिनोलीक अॅसिड नामक फॅटी अॅसिड असते. यामुळे शरीरातील चरबी कमी होऊन वजन घटण्यास मदत होते. वजन कमी करायचे असल्यास आहारात पनीर असलेल्या पदार्थांचा समावेश करावा.

दरम्यान, काही लोकांच्या मते, पनीरमुळे वजन वाढत असल्याने ते खाऊ नये. पण कष्टाची कामे करणाऱ्या लोकांनी पनीर खाल्ल्यास त्यातील कॅलरी सहज बर्न होऊन त्यांना पोषक घटक मिळू शकतात. आहारतज्ज्ञ श्रुती देशपांडे यांच्या मते पनीर योग्य प्रमाणात खावे, अतिजास्त खाऊ नये किंवा खाणे टाळूही नये.

(ही बातमी जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी 'एएमसी मिरर'चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post