कांदा बियाणे निर्यातीवर तात्काळ बंदी; केंद्राचा शेतकऱ्यांना दिलासा

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

परतीच्या पावसानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यातच आधीपासून मुबलक व स्वस्त दरानं कांदा बियाण उपलब्ध नसल्यानं शेतकऱ्यांची होत असलेली परवड थांबवण्यासाठी केंद्र सरकारनं आज तात्काळ कांद्याच्या बियाणे निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (DGFT) यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.


राज्यासह कांदा उत्पादक राज्यांमध्ये कांदा बियाणाचा तुटवडा जाणवत आहे. शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर स्वस्त दरात व मुबलक प्रमाणात कांदा बियाणं उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकारनं बियाणांच्या निर्यातीवर बंदी घालावी, अशी मागणीही शेतकऱ्यांकडून केली जात होती. त्यातच परतीच्या पावसानं महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पिकांची प्रचंड नासाडी केली. यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसला होता.

परतीच्या पावसानं झालेल्या नुकसानीनंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना स्वस्त दरात कांदा बियाणं उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारनं आज कांदे बियाणाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (DGFT) यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियूष गोयल यांनीही ट्विट करत याची माहिती दिली. ग्राहकांसाठी स्वस्त दरात कांद्याचं बियाण उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकारनं तात्काळ कांदा बियाणाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे, असं गोयल यांनी म्हटलं आहे.

यापूर्वी ऑगस्टमध्येच शेतकऱ्यांकडून केंद्र सरकारकडे कांदा बियाणे निर्यातीवर बंदी आणण्याची मागणी केली गेली होती. त्याचवेळी शेतकऱ्यांनी ही निर्यात बंदी तीन महिन्यांच्या कालावधीसाठी असावी असंही म्हटलं होतं. दरम्यान, आज परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (DGFT) यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post