ग्रामपंचायतींना इंटरनेट अडचण; आदर्श सरपंच पवारांनी वेधले सरकारचे लक्ष


एएमसी मिरर वेब टीम 
ऑनलाईन न्यूज 
केंद्र सरकारने पंचायत समिती व जिल्हा परिषद या मधल्या दोन्ही यंत्रणांना बायपास करून ग्रामपंचायतींना थेट विकास निधी देण्याचे धोरण हाती घेतले असले तरी गावपातळीवर इंटरनेट स्पीड कमी असल्याने ऑनलाईन कामे करण्यास ग्रामपंचायतींना अडचणी येत आहेत. या महत्त्वाच्या तांत्रिक अडचणीकडे आदर्श गाव योजना कार्य समितीचे अध्यक्ष व जिल्ह्यातील आदर्शगाव हिवरे बाजारचे सर्वेसर्वा पोपटराव पवार यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे. गुरुवारी नगरच्या दौऱ्यावर येणारे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे या विषयावर चर्चा करण्यासाठी पवारांनी वेळ मागितला आहे व त्यावेळी संबंधित शासकीय अधिकारीही उपस्थित असावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.

पवारांनी पालकमंत्री मुश्रीफ यांना पत्र पाठवले असून, त्यात दूरसंचार निगमच्या महानेट वाय फाय सुविधेच्या अडचणींची मांडणी केली आहे. भारतीय दूरसंचार निगमच्या माध्यामातून देशातील सर्व ग्रामपंचायतींना महानेट अंतर्गत ऑप्टीक फायबर केबलद्वारे जोडण्याचे काम सध्या सुरू असून देशातील प्रत्येक ग्रामपंचायतीस महानेटच्या माध्यमातून वाय फाय सुविधा कार्यन्वित करण्याचा शासनाचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे व नगर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती या प्रकल्पाने जोडल्या आहेत. परंतु नगर तालुक्याचा सर्व्हर नगर शहरात नगर तहसील कार्यालयात असून नगर तालुक्यातील ग्रामपंचायती सर्व्हरला जोडणीचे काम बाकी आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांना ऑनलाईन सुविधा देण्यात अडचणी येतात. त्यामुळे सर्व ग्रामपंचायतींना वाय फाय सुविधा मिळाल्यास ऑनलाईन प्रक्रिया गतिमान होऊन ऑनलाईनचा फायदा नागरिकांना, शालेय विद्यार्थ्यांना, बँकेशी संबंधित व्यवहारासाठी, आपले सरकार सेवा केंद्र यासाठी उपयोग होणार आहे, असा विश्वास पवारांनी या पत्रात व्यक्त केला आहे. गेल्या वर्षभरापासून तालुक्यातील ग्रामपंचायतींना तहसीलच्या सर्व्हरला जोडणी न केल्यामुळे ऑनलाईन कामात अडचणी येत आहेत. त्यामुळे २२ रोजी दुपारी ठीक ३ वाजता शासकीय विश्रामगृहात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांना बोलावून या योजनेचा आढावा घेण्यासाठी वेळ द्यावा, अशी मागणीही पवारांनी मुश्रीफ यांच्याकडे केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post