मोड आलेल्या मूगाचा न्याहारीत करा समावेश.. दिवसभर राहाल उत्साही

 

एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

सकाळची न्याहारी चांगली झाल्यास दिवसभर काम करण्याचा उत्साह मिळतो. त्यामुळे सकाळची न्याहारी पौष्टीक असण्याची गरज आहे. काहीजण वेळेअभावी सकाळी न्याहारी टाळतात. तर काहीजण हलकेफुलके खातात. मात्र, या सवयींचा आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सकाळची न्याहारी महत्त्वाची आहे. सकाळच्या न्याहारीत मोड आलेल्या मूगाचा समावेश केल्यास शरीराला आवश्यक ते घटक मिळतात आणि दिवसभर काम करण्याचा उत्साह राहातो आणि शरीराला आवश्यक ती उर्जाही मिळते.

मोड आलेल्या मूगाचे शरीराला अनेक फायदे होतात. मूगडाळीत फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पोटाशी संबंधित विकार दूर होण्यास मदत होते. सकाळच्या न्याहारीत तळलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने पोट जड होणाऱ्यांनी न्याहारीत मोड आलेल्या मूगाचा समावेश करावा. अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांनी न्याहारीत मोड आलेल्या मूगाचा समावेश केल्यास त्यांनाही फायदा होतो. मोड आलेल्या मूगाच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते आणि आरोग्यही चांगले राहते.

सकाळची न्याहारी झाल्यावर अनेकांना उत्साह वाढण्याऐवजी सुस्ती वाटते. अशांनी सकाळी पचण्यास जड असलेल्या पदार्थांचे सेवन करण्याऐवजी मोड आलेल्या मूगाचा न्याहारीत समावेश करावा. त्यामुळे मेटाबॉलिक रेट वाढत असल्याने शरीराला जास्तवेळ काम करण्याची उर्जा मिळते. तसेच सुस्तीही दूर होते. मोड आलेल्या मूगाच्या सेवनाने शरीरातील साखरेचे प्रमाण वाढत नसल्याने मधुमेहींनाही त्याचा फायदा होतो. तसेच वजन नियंत्रणात राहते. त्यामुळे वजन कमी करण्याची इच्छा असलेल्यांनाही मोड आलेल्या मूगाची न्याहारी फायद्याची ठरते. मूगाला मोड येण्यासाठी रात्री ते पाण्यात भिजवून ठेवावे. सकाळी त्यांना मोड आल्यावर स्वच्छ पाण्याने धूवून त्यात लिंबू ,मीठ ,तिखट आणि चाट मसाला टाकावा. चव येण्यासाठी त्यात कांदा आणि कोथिंबीरही टाकता येते. न्याहारीत मोड आलेल्या मूगाचा समावेश करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

(ही माहिती जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी 'एएमसी मिरर'चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय/घरगुती उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post