ॲसिडीटी कशी आटोक्यात ठेवाल? पोटाच्या तक्रारींवर 'हे' आहेत उपाय


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

नवरात्रीमध्ये उपवास निमित्ताने आपल्या आहारात विविध पदार्थांचा समावेश झाल्याने काही वेळा आपल्या पोटाची घडी विस्कटते. ॲसिडीटी, पित्त, अपचन या तक्रारी बऱयाच लोकांमध्ये आढळतात. मग आता या पोटाच्या तक्रारींवर कोणते उपाय करावे हे पाहूया..

रोजच्या जेवणाकडे पुन्हा वळताना सुरुवातीला हलका आहार घ्यावा. एकदम जास्त किंवा जड होईपर्यंत जेवल्यास त्रास होऊ शकतो. पचायला हलके पदार्थ खावेत.

जेवणाच्या वेळा चोख पाळाव्यात. कारण अवेळी जेवणामुळे अपचन, ॲसिडीटीचे त्रास होणे स्वाभाविक आहे. न्याहारी, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण वेळेवर घ्यावे. रात्रीचे जेवण किमान झोपायच्या आधी दोन तास घ्यावे.

उकाडा वाढल्यामुळे पाणी आणि साखरविरहित पेयांचे सेवन योग्य प्रमाणात करणे गरजेचे आहे. ताकही नियमित प्यावे. शरीराला थंडावा देणारे पदार्थ जसे सब्जाचे बी, गुलकंद आहारात घ्यावे.

तूपकट, तेलकट किंवा चमचमीत पदार्थांचा समावेश आवर्जून टाळावा. यामुळे ॲसिडीटी किंवा जळजळ होऊ शकते.

रात्रीच्या आहारात भाताचा समावेश आवर्जून करावा. दहीभात, दूधभात, ताकभात, मऊ खिचडी, मेतकूटभात असा हलका आहार रात्रीचा ठेवावा. त्याबरोबर एखादी भाजी किंवा कोशिंबिरीचा समावेश करावा.

या काही गोष्टींचे पालन करून आपण ॲसिडीटी किंवा पित्ताचा त्रास आटोक्यात ठेवू शकतो.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘एएमसी मिरर’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post