मुलांचं स्मार्टफोनचं व्यसन सोडवायचंय?एएमसी मिरर वेब टीम 
ऑनलाईन न्यूज
 
सध्या लॉकडाऊनच्या काळात लहान मुलांचा स्मार्टफोनचा वापर भलताच वाढला आहे. आधीच स्मार्टफोनचं आकर्षण असलेल्या मुलांचा लॉकडाऊनमध्ये स्मार्टफोन वापराचा वेळही वाढला आहे. त्यामुळे आता त्यांच्या हातातून स्मार्टफोन कसा सोडवायचा, असा प्रश्न अनेक पालकांना पडला आहे.

याचं उत्तर कठीण असलं तरी अशक्य मुळीच नाही. रोजच्या सवयींमध्ये काही बदल करून तुम्ही मुलांची स्मार्टफोन हाताळण्याची सवय मोडू शकता. मुलांचं स्मार्टफोनचं व्यसन कसं कमी करावं, यासाठी पालकांनी अनेक प्रश्न सोशल मीडियावरही विचारले होते. त्यांना कोरा या प्रश्न उत्तरांच्या मंचावर कीर्ती परचुरे यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

मुलांचं स्मार्टफोनचं व्यसन कमी करण्यासाठी हे करा :

1. मुलांच्या हातात स्मार्टफोन देणं बंद करा. सध्या ऑनलाईन शाळा वगळता त्यांना स्मार्टफोनचा वापर करूच देऊ नका. त्याऐवजी हळूहळू त्यांचं मन दुसरीकडे वळवा. सुरुवातीला ठराविक वेळेपुरता टीव्हीचा आधार घ्या. जेणेकरून टीव्हीवर मुलं काय पाहतील आणि पाहणार नाहीत, त्यावर तुम्ही नियंत्रण ठेवू शकाल.

2. मुलांची सवय कमी करण्यासाठी आधी पालकांनी स्वतः देखील स्मार्टफोनचा वापर नियंत्रित करणं गरजेचं आहे. असंख्य बिनकामाचे फॉर्वर्डेड सर्फिंग करण्यापेक्षा फोन हातात कामापुरताच घ्या. त्याऐवजी मुलांशी बोला, संवाद साधा. त्यांच्या मनात चाललेले विचार, प्रश्न समजून घ्या.

3. सुरुवातीचे काही दिवस टीव्हीकडे लक्ष वळवल्यानंतर आता मुलाचं मन खऱ्याखुऱ्या आयुष्यातील गमतीजमती, खिडकीतून दिसणारं जग याकडे वळवा. घराच्या आजूबाजूला निसर्ग असेल तर त्यातील प्राणी पक्षी झाडांकडे त्यांचं लक्ष वळवा. त्यासाठी त्यांच्या खाण्याच्या वेळात त्यांच्यासोबत वेळ घालवा. खिडकीबाहेर दिसणाऱ्या जगातील गोष्टींविषयी बोला. त्यामुळे मुलांना जिज्ञासा निर्माण होते.

4. मुलांशी मोकळ्या वेळात खेळा. पुस्तकं वाचून दाखवा. नवीन खेळ, हस्तकला, चित्रकला यांत त्यांचं मन गुंतवा. स्मार्टफोनमुळे मुलांची उपजत कल्पकता नाहीशी होते. ती होऊ नये यासाठी त्या कल्पकतेला वाव द्या. वेगवेगळे बैठे खेळ खेळा.

5. घरातील छोट्या मोठ्या कामांमध्ये त्यांना सहभागी करून घ्या. भाजी निवडणे, भांडी लावणे, कपडे वाळत घालणे, फर्निचर पुसणे या छोट्या छोट्या कामांमुळे त्यांचा वेळ, ताकद योग्य ठिकाणी खर्च होईल आणि घरची कामं कंटाळवाणी न वाटता त्यांना त्यांची सवयही होईल.

6. हे सगळं करताना मुलं सहजासहजी जुमानणार नाहीत. पण, हे प्रयत्न पालकांना सुरूच ठेवावे लागतील. काही काळानंतर मुलांचं मन वळवणं शक्य होईल. पण, प्रयत्नात खंड पडू देऊ नका.

(संकलित केलेल्या माहितीनुसार ही बातमी करण्यात आली आहे. त्यामुळे यातील मतांशी 'एएमसी मिरर'चा संबंध नाही.)

Post a Comment

Previous Post Next Post