राष्ट्रवादी नेत्याच्या फेसबुक प्रोफाईलवर मोदींचा फोटो; फेक अकाउंटची तक्रार

  

एएमसी मिरर वेब टीम
मुंबई :
अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी फेक अकाऊंटस् तयार आल्याचा मुद्दा चर्चेत असतानाच राज्याचे गृहनिर्माण मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या नावेही फेक अकाऊंट सुरू असल्याचं समोर आलं आहे. खुद्द जितेंद्र आव्हाड यांनी ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली आहे. फेसबुकवर हे बनावट खातं असून, प्रोफाईलला मोदींचा फोटो आहे.


आव्हाड यांनी स्वतःच्या नावे सुरू असलेल्या फेक अकाऊंटची मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या नावे फेसबुकवर हे अकाऊंट आहे. जितेंद्र आव्हाड साहेब असं अकाऊंटचं नावं असून प्रोफाईलला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रभू रामचंद्र यांचा फोटो आहे. राम मंदिरही आहे. तर वॉलपेपरला मोदी यांचा जनतेला संबोधित करतानाचा फोटो आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी या फेक अकाऊंटची मुंबईचे पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस व महाराष्ट्र सायबर सेलकडे तक्रार केली आहे. फेक अकाऊंट असून, त्याचा चुकीचा वापर केला जात आहे. त्यामुळे आपण मुंबई पोलीस, मुंबई पोलीस आयुक्त, महाराष्ट्र सायबर सेल, ठाणे पोलिसांकडे तक्रार केली आहे, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येला साडेतीन महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटून गेला आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सुरूवातीला मुंबई पोलिसांनी सुरू केला होता. मात्र, मुंबई पोलिसांना आणि पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या तपासाला बदनाम करण्यासाठी त्या काळात सोशल मीडियावर तब्बल ८० हजार फेक अकाऊंटस् सुरू करण्यात आली होती. त्यामाध्यमातून बदनामी केली गेली, अशी धक्कादायक माहिती समोर आली होती.

Post a Comment

Previous Post Next Post