‘के.के. रेंज’ प्रकरणी ‘राष्ट्रवादी’च्या आमदारांचा गौप्यस्फोट


एएमसी मिरर वेब टीम
ऑनलाईन न्यूज

के. के. रेंजसाठी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, नगर व राहुरी तालुक्यातील 23 गावांमधील शेतकर्‍यांच्या जमिनींचे हस्तांतर करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मान्यता दिली होती. 18 मे 2017 मध्ये मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली होती, असा गौप्यस्फौट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी केला आहे. फडणवीस व भाजप सरकारच्या पापाचे खापर आमच्या सरकारच्या माथ्यावर फोडण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा डाव उधळून लावला, असेही ते म्हणाले.

शनिवारी सायंकाळी पारनेर तालुक्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. के. के. रेंंजसाठी लष्कराला जमिनी देण्यावरुन मागील काही महिन्यात जिल्ह्यामध्ये वातावरण तापले होते. भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी या प्रश्नावरुन गावोगाव बैठका घेत राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार लंके यांनी थेट शरद पवार यांना या प्रश्नाचे साकडे घालून संरक्षण मंत्र्यांसमवेत बैठक घडवून आणली. त्यानंतर आता केके रेंजसाठी जमिनींचे अधिग्रहण होणार नाही, असे काही दिवसांपूर्वीच अधिकार्‍यांकडून जाहीर करण्यात आले. यावरुन आमदार लंके यांनी भाजप व तत्कालीन फडणवीस सरकाराला पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे.

के. के. रेंजला जमीनी देण्याचा निर्णय तत्कालीन फडणवीस सरकारने घेतला होता. मागच्या सरकारच्या काळात हे घडले. शेतकर्‍यांची जाणीव असणारे सरकार राज्यात आल्याने तसेच शरद पवार यांच्यामुळे या संकटावर आपण मात करू शकलो. फडणवीस सरकारचे पाप आमच्या सरकारच्या डोक्यावर फोडण्याचे काम सुरू झाले होते. काही विद्वान या विषयावर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत होते, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
राजकारणाच्या वेळी राजकारण करू. गोरगरीबांच्या जिवाशी का खेळता? असा सवाल त्यांनी केला. आम्ही संरक्षणमंत्र्यांची भेट घेतली नसती, तर तिन्ही तालुक्यातील जमिनींचे हस्तांतर झाले असते. आता रेड झोनचे काय झाले? असा प्रश्न उपस्थित करून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला आहे. रेड झोनचे नाव पुढे करून इतरांसारखा फसविण्याचा आमचा धंदा नाही. कुणाला एजंटकी, कोणाला दलाली खायची तर कोणाला जमिनी विकायच्या होत्या. कशाआड काय दडलय ते कळलं पाहिजे. रेडझोनची काळजी करू नका. तुमचा माझ्यावर भरवसा नाही काय? कुठे सह्या करायला निघाले होते? असा सवाल करत त्यांनी खासदार विखे यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले. शरद पवार यांच्या माध्यमातून हा प्रश्न मी कायमचा मार्गी लावणार आहे. के. के. रेंजचं मानगुटीवर बसलेलं भूत कायमचं काढून टाकणार आहोत, असे ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post